सुंदर दिसणं हा केवळ महिलांचा अधिकार नाही. पुरुषांसाठीही सुंदर दिसणं तितकच महत्त्वाचं आहे. आता तर मार्केटमध्ये पुरुषांसाठीही वेगवेगळे ब्यूटी प्रॉडक्ट्स आले आहेत. तुम्हालाही जर चेहरा चमकदार करायचा असेल किंवा चांगला लूक हवा असेल तर या केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करण्याऐवजी काही घरगुती फेसपॅकचा वापर करु शकता. असेच काही घरगुती फेसपॅक कसे तयार करायचे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
शेविंगनंतर करा वापर
शेविंग करताना पुरुषांच्या त्वचेला वेगवेगळ्या अत्याचारांचा सामना करावा लागतो. कधी कापलं जातं, तर कधी खरचटतं. तुम्हालाही अशा काही अनुभवांना सामना करावा लागत असेल तर हे घरगुती फेसपॅक तुम्ही ट्राय करु शकता. याने त्वचेची काळजीही घेतली जाते.
काकडीचा फेसपॅक
काकडी, ओटमील आणि दही एकत्र करुन हा फेसपॅक तयार करा आणि शेविंगनंतर चेहऱ्यावर लावा. साधारण ३० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. याने चेहरा मुलायम होईल आणि चेहऱ्याला थंडही वाटेल.
हळदीचा फेसपॅक
हळद पावडर, बेसन आणि बदामाचं तेल मिश्रित करा. हे मिश्रण शेविंग केल्यावर चेहऱ्यावर लावा. याने त्वचा मुलायम होते आणि शेविंगदरम्यान काही कापल्यानंतर पडलेले डाग तेही दूर होतात.
मधाचा फेसपॅक
शेविंगनंतर मध आणि गुलाबजल एकत्र करुन चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण चेहऱ्यावर २० ते ३० मिनिटांसाठी तसंच ठेवा, त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
केळ्याचा फेसपॅक
ज्या पुरुषांची त्वचा रखरखीत किंवा कोरडी असते त्यांनी केळी, दही आणि मध एकत्र करुन फेसपॅक तयार करावा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून १० ते २० मिनिटे ठेवा. याने चेहरा फ्रेश आणि तजेलदार वाटेल.
पपईचा फेसपॅक
पपईमध्ये एक खासप्रकारचं एंजाइम असतं. याने मृत त्वचा दूर करण्यास मदत मिळते. पपईचा हा फेसपॅक सनबर्न आणि त्वचेला होणारी खास दूर करण्यासही मदत करतो.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.