(Image Credit : fabfitfun.com)
स्कीन फास्टिंग करण्याचा अलिकडे काही देशांमध्ये फारच ट्रेन्ड आला आहे. ही एक जपानी पद्धत आहे. स्कीन म्हणजे त्वचा आणि फास्टिंग म्हणजे उपाशी राहणे. म्हणजे आपली त्वचा उपाशी ठेवण्याला स्कीन फास्टिंग म्हटलं जातं. स्कीन फास्टिंगमध्ये १ ते २ दिवस त्वचेवर कोणत्याही प्रकारचे प्रॉडक्ट वापरले जात नाहीत. ज्यामुळे त्वचा डीटॉक्स होऊ लागते.
अलिकडे सुंदरता वाढवण्यासाठी दिवसेंदिवस स्कीन प्रॉडक्ट्सचा वापर वाढल्यामुळे त्वचेचं नैसर्गिक सौंदर्य कमी होत आहे. इतकेच नाही तर स्कीन प्रॉडक्ट्सचा एका काळानंतर जास्त वापर केल्याने स्कीनमधील नैसर्गिक तेल नष्ट होऊ लागतं. त्यामुळे आपली त्वचा पूर्णपणे ड्राय होते.
अनेक त्वचारोग तज्ज्ञांचं मत आहे की, स्किन फास्टिंगबाबत लोक चुकीचा विचार करू लागले आहेत. लोकांना वाटतं की, यात कोणत्याही प्रकारच्या स्कीन प्रॉडक्टचा वापर करता येत नाही. हा समज फार चुकीचा आहे. स्कीन फास्टिंगचा अर्थ हा नाहीये. फक्त जर तुम्ही १ ते २ दिवस स्किन प्रॉडक्ट्सचा वापर केला नाही तर तुमची त्वचेवर चांगला प्रभाव पडतो. पण तुम्ही कधीच काही लावलं नाही तर याने सन डॅमेज, सनबर्न, ड्राय स्कीन, एक्ने इत्यादी होऊ शकतं.
तज्ज्ञ सांगतात की, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या त्वचेनुसार क्रीमचा वापर करावा लागेल. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला क्लिन्जर, सनस्क्रीन, डे क्रीम आणि नाइट क्रीमचा वापर करणं गरजेचं आहे. नाइट क्रीमचा वापर अधिक गरजेचा असतो. कारण दिवसभर त्वचेचं झालेलं नुकसान नाइट क्रीमने भरून काढता येतं.
ज्याप्रमाणे आपल्या शरीराला पोषक तत्वांची गरज असते, तशीच आपल्या त्वचेलाही निरोगी राहण्यासाठी पोषक तत्वांची गरज असते. हे तत्व त्वचेला निरोगी ठेवण्यास फायदेशीर असतात. पण जर तुम्ही स्किन फास्टिंगमुळे त्वचेवर कोणतंही क्रीम लावत नसाल तर याने तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं.