गरमीमुळे घाम येणं सामान्य बाब आहे. पण यामुळे वेगवेगळ्या समस्याही होतात. एकतर घामामुळे शरीराची दुर्गंधी येते. तसेच त्वचेला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. पण शरीरातून घाम जाणे गरजेचे आहे. कारण याने शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. घामामुळे त्वचा आणि केसांचं देखील नुकसान होतं. घामामुळे केस कमजोर होतात आणि तुम्हाला केसगळतीची समस्या होऊ लागते. अशात काय काळजी घ्यावी याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत.
केसांवर घामाचा प्रभाव
घामामध्ये लॅक्टिक अॅसिड फार जास्त प्रमाणात असतं. हे तेच अॅसिड आहे जे दह्यात आढळतं. थोड्या प्रमाणात लॅक्टिक अॅसिड केसांसाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे काही समस्या असेल तर केसांना दही लावल्यास आराम मिळतो. पण जास्त लॅक्टिक अॅसिड झाल्यास डोक्याच्या त्वचेची रोमछिद्रे बंद होतात आणि लहान होतात. त्यामुळे रोमछिद्रांची केसांवरील पकड कमजोर होते आणि केस तुटू लागतात. जास्त घामामुळे डोक्याला खाज आणि डोक्याच्या त्वचेवर सूज येऊ शकते. तसेच लॅक्टिक अॅसिडमुळे केसांच्या निर्मितीसाठी आवश्यक केरोटिन तत्व नष्ट होतात. ज्यामुळे केस कमजोर होऊ लागतात आणि केसांचा विकासही होत नाही.
काय करावे?
घामामुळे केसांचं होणारं नुकसान टाळायचं असेल तर केस चांगल्याप्रकारे धुतले पाहिजे. जर तुम्ही उन्हात, धुळीत आणि प्रदूषणाच्या जास्त संपर्कात येत असाल तर प्रयत्न करा की, आठवड्यातून दोन ते तीन वेळा माइल्ड शॅम्पूने केस धुवा. जास्त केस न धुता राहू देऊ नका. जेव्हा वातावरण आणखी जास्त गरम होतं तेव्हा केसांचं अधिक नुकसान होतं अशावेळी केसांवर कपडा बांधण्यापेक्षा छत्रीचा वापर करु शकता. याने केसांना श्वास घेण्यासाठी हवा मिळेल आणि घामही कमी येईल.
तेलाने मालिश
केस मजबूत करण्यासाठी आणि तुटण्यापासून वाचवण्यासाठी तुम्हाला आठवड्यातून कमीत कमी दोनदा केसांच्या मुळात आवळा, बदाम, ऑलिव ऑइल, खोबऱ्याचं तेल किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करावी. याने केसगळती, केस पातळ होणे, डॅंड्रफ होणे, केस पांढरे होणे यांसारख्या समस्या दूर होऊ शकतात.
उडदाच्या डाळीची पेस्ट
साल नसलेली उडदाची डाळ उकडून त्याची पेस्ट तयार करा. रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट केसांच्या मूळात लावा. याने डोक्यांला थंड वाटेल आणि घाम निघण्याची प्रक्रियाही याने हळूवार होईल. ही पेस्ट सतत काही दिवस केसांना लावा. काही दिवसांनी तुम्हाला फायदा बघायला मिळेल.
पुन्हा पुन्हा केस करु नका
काही लोक पुन्हा पुन्हा केसांवरुन कंगवा फिरवतात. ते असा विचार करतात की, याने केस लांब होतील किंवा केस गुंतणार नाहीत. पण सतत असं केल्याने केसगळती होते. दिवसातून केवळ २ ते ३ वेळाच केसांवर कंगवा फिरवा. याने केसगळती कमी होईल. केस गुंतणारही नाही आणि तुटणारही नाहीत.