जसजसं वय वाढत जातं सर्वातआधी त्याचा प्रभाव चेहऱ्यावर दिसू लागतो. अनेकदा चेहऱ्याची खूप काळजी घेऊनही वाढत्या वयाची लक्षणे चेहऱ्यावर दिसू लागतात. यात त्वचा सैल होणे, सुरकुत्या पडणे या समस्या होतात. प्रत्येकालाच वाटत असतं की, त्यांनी नेहमी तरूण दिसावं. पण हे नुसतं वाटून काही फायदा नाही. त्यासाठी काही गोष्टींची खास काळजी घ्यावी लागते.
जर तुम्हालाही नेहमी तरूण दिसायचं असेल किंवा वाढत्या वयाची लक्षणे चेहऱ्यावरून दूर करायची असेल तर काही ड्रिंक्स फाय फायदेशीर ठरतात. या ड्रिंक्सचं नियमित सेवन करून तुम्ही नेहमी तरूण दिसू शकता. चला जाणून घेऊ कोणते आहेत हे ड्रिंक्स.
दूध
दुधात सर्वच महत्वपूर्ण खनिजे, प्रोटीन आणि पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. तसेच दूध प्यायल्याने हाडेही मजबूत होतात. इतकेच नाही तर दुधाचं सेवन करून त्वचेची चमकही तुम्ही कायम ठेवू शकता. पण यासाठी तुम्हाला दुधाचं नियमित सेवन करावं लागेल.
कॉफी
कॉफीमध्ये आढळणारे रासायनिक तत्व त्वचेच्या कॅन्सरशी किंवा त्वचासंबंधी आजारांशी लढतात. त्यामुळे कॉफी पिणे त्वचेसाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर ठरते. पण म्हणून कॉफीचं अधिक सेवन करू नये. कॉफीचं अधिक सेवन करणं तुम्हाला महागात पडू शकतं.
ग्रीन टी
गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टी सेवन करण्याची चांगलीच क्रेझ वाढली आहे. वजन कमी करण्याच्या दृष्टीने ग्रीन टी कडे पाहिलं जातं. त्यासोबतच ग्रीन टी मुळे त्वचेवरील तणावही दूर होतो. त्वचा ग्लो करू लागते.
बीटाचा रस
बीट हे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. बीटात हेल्दी नायट्रेट्स असतात जे रक्ताचा प्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करतात आणि रक्त शुद्धही करतात. अर्थातच याचा फायदा त्वचेवरील चमक वाढण्यासाठी होतो.
सोया मिल्क
सोया मिल्कमध्ये आयसोप्लोबोनस तत्व असतं. याने त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत. तसेच त्वचेची चमक कायम राहते.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)