(Image Credit : Boldsky.com)
पिंपल्ससोबतच ब्लॅकहेड्सच्या समस्येने अनेकजण हैराण झालेले असतात. मग त्यावर उपाय म्हणून वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर सुरु होतो. काहींना फायदा होतो तर काहींना नाही. पण मुळात जर ब्लॅकहेड्स येण्याचं कारण शोधलं आणि आपण करत असलेल्या चुका टाळल्या तर ही समस्या होणारच नाही. त्यामुळे तुम्हाला ब्लॅकहेड्स होण्याची काही कारणे सांगत आहोत. या चुका टाळात तर तुम्हाला या समस्येशी सामना करावाच लागणार नाही.
१) अस्वच्छ उशीचा वापर
तुमच्या उशीच्या कव्हरला त्वचेवरील घाण, घाम आणि मेकअप लागतं. मग जेव्हा तुम्ही त्यावर झोपता तेव्हा तेव्हा ती घाण पुन्हा तुमच्या चेहऱ्यावर लागते. ही घाण रात्रभर तुमच्या चेहऱ्यावर तशीच राहते. आणि मग त्वचेवर ब्लॅकहेड्स येतात. त्यामुळे उशीचं कव्हर दर तीन दिवसांनी बदला.
२) आंघोळीआधी चेहरा धुणे
अनेकजण आधी चेहरा स्वच्छ करतात आणि नंतर आंघोळ करताना शॅम्पू किंवा कंडीशनर लावतात. याने होतं हे की, शॅम्पू-कंडीशनरचे काही कण आपल्या त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये अडकून राहतात. ज्याकारणाने ब्लॅकहेड्स येतात. त्यामुळे आंघोळ करताना शेवटी चेहरा चांगल्याप्रकारे स्वच्छ करावा.
३) अस्वच्छ पाण्याचा वापर
अनेकदा विहीर किंवा इतर ठिकाणांहून आपल्यापर्यंत येणारं पाणी हे हार्ड वॉटर असतं. जेव्हा हे पाणी चेहऱ्या स्वच्छ करण्यासाठी वापरलं जातं तेव्हा पाण्यातील काही तत्व आपल्या चेहऱ्यावर चिकटतात. याने त्वचेची रोमछिद्रे बंद होतात आणि याच कारणाने ब्लॅकहेड्स येतात. त्यामुळे चेहरा धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करा.
४) मेक-अप लावून जिमला जाणे
अनेकजण जिममध्ये वर्कआउट करताना चांगला सेल्फी यायला हवा म्हणून मेक-अप करुन जिमला जातात. अशात मेक-अप लावून एक्सरसाइज केल्याने ब्लॅकहेड्स होऊ शकतात. जेव्हा एक्सरसाइज करताना घाम येतो तेव्हा मेक-अप रोमछिद्रांमध्ये अडकतो आणि रोमछिद्रे बंद होतात. त्यामुळे एक्सरसाइज करण्याआधी मेक-अप करणे टाळा.