केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या जीएसटी कपातीमुळे वाहन उद्योगात, खरेदीदारांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी, सणासुदीच्या काळात चारचाकी गाड्या आणि दुचाकींवर मोठ्या सवलती मिळण्याची शक्यता कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, मागणी वाढल्याने आणि कंपन्यांना आपले नफ्याचे मार्जिन वाढवायचे असल्याने उत्सवकाळातील सूट देण्याची शक्यता कमी आहे.
यंदाच्या फेस्टीव्ह सीझनमध्ये ऑटो कंपन्या जीएसटी हाच डिस्काऊंट समजून दरवर्षी जो फेस्टीव्ह डिस्काऊंट जाहीर करतात तो देणार नाहीत, असे मोतीलाल ओसवालच्या अहवालात म्हटले आहे. याबाबतचे वृत्त अमर उजालाने दिले आहे. जीएसटी कपातीमुळे कमी झालेल्या किंमतींचाच फायदा या कार कंपन्या घेणार आहेत. काही ठिकाणी टाटाच्या शोरुम कर्मचाऱ्यांनी देखील फेस्टीव्ह डिस्काऊंट नाही मिळणार असे म्हटले आहे.
जीएसटी कमी झाल्याने कंपन्यांना आता फेस्टीव्ह डिस्काऊंट देण्याची गरज उरलेली नाही. जीएसटी कपातीमुळे मागणी वाढणार आहे. त्यामुळे कंपन्या फेस्टीव्ह डिस्काऊंट रद्द करून नफेखोरी करणार आहेत.
ग्राहकांवर परिणाम
जीएसटी कपातीमुळे लहान गाड्या आणि दुचाकी स्वस्त झाल्या आहेत, तर मोठ्या गाड्या आणि एसयूव्हीच्या दरातही काही प्रमाणात घट झाली आहे. याचा फायदा कंपन्यांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवला आहे. मारुती सुझुकी, महिंद्रा आणि जग्वार लँड रोव्हरसारख्या कंपन्यांनी त्यांच्या मॉडेल्सच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे, जर तुम्ही स्वस्त गाडी घेण्यासाठी सणासुदीच्या मोठ्या सवलतीची वाट पाहत असाल, तर तुम्हाला निराशा होऊ शकते. कारण किमती आधीच कमी झाल्या असल्यामुळे, कंपन्या अतिरिक्त सूट देण्याची शक्यता कमी आहे.