भारतीय ऑटो मार्केट सातत्याने नवीन वाहनांनी भरले जात आहे. मे २०२५ मध्ये फोक्सवॅगन गोल्फ जीटीआय आणि टाटा अल्ट्रोज सारख्या कार लाँच झाल्या, तर आता जून २०२५ हा महिना आणखी खास असणार आहे. खरे तर, या महिन्यात इलेक्ट्रिकपासून ते लक्झरी सेडानपर्यंत अनेक नवीन कार भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज आहेत. तर जाणून घेऊयात जूनमध्ये लॉन्च होणाऱ्या कार संदर्भात...
टाटा हॅरियर ईव्ही -टाटा हॅरियर ईव्ही पहिल्यांदा २०२५ च्या इंडिया मोबिलिटी एक्सपोमध्ये दाखवण्यात आली होती आणि आता ती जूनमध्ये लाँचसाठी सज्ज आहे. तिची रचना सध्याच्या आयसीई हॅरियरसारखीच असेल, मात्र ती इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. पॉवरट्रेन संदर्भातील माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
मर्सिडीज-एएमजी जी ६३ कलेक्टर एडिशन -मर्सिडीज-बेंझ इंडिया, १२ जून २०२५ रोजी एएमजी जी ६३ चे स्पेशल कलेक्टर एडिशन लाँच करणार आहे. ही मर्यादित युनिट्समध्ये उपलब्ध असेल. ही कार काही खास स्टायलिंग घटकांमुळे आणखी खास होईल. ही एसयूव्ही लक्झरी आणि पॉवरचे परिपूर्ण कॉम्बिनेशन असेल.
एमजी सायबरस्टरएमजी सायबरस्टर ही दोन-दरवाज्यांची कन्व्हर्टेबल इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार आहे. ही कार तरुण आणि स्पोर्टी कार प्रेमींसाठी एक परिपूर्ण पॅकेज ठरू शकते. ही कार देशातील पहिली इलेक्ट्रिक रोडस्टर असेल. ही कार दोन बॅटरी पॅक पर्यायांसह उपलब्ध आसेल.
ऑडी क्यू ५ फेसलिफ्ट - ऑडी क्यू५ ला जून महिन्यात एक मिड-सायकल फेसलिफ्ट मिळणे अपेक्षित आहे. यात नवीन फ्रंट ग्रिल, स्लीक एलईडी हेडलॅम्प आणि चांगले इंटीरियर अपडेट्स दिसतील. सध्या, ते केवळ सिंगल इंजिन पर्यायासह येते, मात्र, फेसलिफ्टमध्ये काही खास वैशिष्ट्ये दिसू शकतात.
बीएमडब्ल्यू २ सिरीज फेसलिफ्ट -बीएमडब्ल्यू २ सिरीजला मिड-सायकल अपडेट मिळणार असल्याचे समजते. ही कार जागतिक पातळीवर आधीच शोकेस करण्यात आली आहे आणि भारतात जून महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. हिच्या बाह्य भागात नवे एलिमेंट्स, नवे इन्फोटेनमेंट सिस्टिम आणि पॉवरट्रेनमध्ये काही छोटे मोठे बदल दिसू शकतात.