सुरत : गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये महापूर आला होता. यामुळे वाहतूक अधिकाऱ्यांनी बडोद्यातील लोकांसाठी वाहतुकीचे नियम शिथिल केले आहेत. 15 ऑगस्टपर्यंत कोणताही नियम तोडला तरीही चलन फाडण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापूराच्या पाण्याने आधीच लोक त्रस्त आहेत. यामुळे कोणाच्या इलेक्ट्रीक वस्तू, कोणाची वाहने तर अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. त्यातच घरे, दुकानांमधील वस्तू भिजल्याने नुकसान झाले आहे. यामुळे त्रासामध्ये असलेल्य़ा लोकांना दिलासा देण्यासाठी वाहतूक विभागाने 15 ऑगस्टपर्यंत सूट दिली आहे. याकाळात एकही चलन फाडले जाणार नाही.
बडोदा शहरामध्ये गेल्या आठवड्यात 21 इंचांपर्यंत पाणी भरले होते. यामुळे वाहतूक पोलिसांनी 15 ऑगस्टपर्यंत वाहतूक नियम तोडणारे किंवा वाहतूक कायद्याचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरोधात कोणताही दंड आकारला जाणार नाही. यामागे पोलिसांचे म्हणणे आहे की, नागरिक आधीच अनेक संकटांनी त्रस्त झाले आहेत. यात त्यांना आणखी त्रास देण्याची इच्छा नाही.