चोराच्या उलट्या बोंबा! टेस्लाच्या कॅमेऱ्यांवर चीनची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 07:36 AM2021-03-24T07:36:25+5:302021-03-24T07:36:47+5:30

जगातील एक प्रमुख आणि प्रसिद्ध कंपनी असलेल्या ‘टेस्ला’ कंपनीच्या गाड्यांवर आता चीनने आक्षेप नोंदवला आहे.

Thief's vomit bomb! China's eye on Tesla's cameras | चोराच्या उलट्या बोंबा! टेस्लाच्या कॅमेऱ्यांवर चीनची नजर

चोराच्या उलट्या बोंबा! टेस्लाच्या कॅमेऱ्यांवर चीनची नजर

googlenewsNext

हेरगिरी आणि चीन ह्यांचे काय नाते आहे हे काही वेगळे सांगायला नको. जगातल्या प्रमुख देशांमधल्या विविध संरक्षण संस्था, राजकारणातील महत्त्वाच्या व्यक्ती, प्रमुख व्यापारी संस्था, शास्त्रज्ञ अशा अनेकांवरती चीन कायम छुपेपणाने पाळत ठेवून असतो, असा आरोप अनेकदा केला जातो.  अगदी चिनी हॅकर्सचे जाळे आणि ह्या हॅकर्सला चीन सरकारचा असलेला छुपा पाठिंबा ह्यावरतीदेखील अनेकदा वादंग घडतात. मात्र आता ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा नवाच प्रकार चीनच्या बाबतीत झाला आहे. 

जगातील एक प्रमुख आणि प्रसिद्ध कंपनी असलेल्या ‘टेस्ला’ कंपनीच्या गाड्यांवर आता चीनने आक्षेप नोंदवला आहे. गंमत म्हणजे ह्या गाड्यांमध्ये लावलेल्या कॅमेऱ्याद्वारे हेरगिरी होण्याची भीती चीनच्या सैन्याने  व्यक्त केली आहे. एवढेच नव्हेतर, चिनी सैन्याने आपल्या भागात टेस्लाच्या गाड्यांना प्रवेशबंदीदेखील जाहीर केली आहे. टेस्लाचे सर्वेसर्वा  एलॉन मस्क ह्यांनी जराही डगमगून न जाता, चीन सरकारला चांगलेच ठणकावले आहे.  आपल्या गाड्यांचा उपयोग हेरगिरीसाठी होत असल्याचे सिद्ध झाले, तर आपण ह्या गाड्याच बंद करू, असे एलॉन मस्क ह्यांनी जाहीरपणे- तेही खुद्द चीनमध्येच व्हर्च्युअल मुलाखत देताना सांगितले आहे.  

कोणत्याही देशात आपल्या वाहनाचा वापर अवैध कामासाठी होत असल्यास तिथेदेखील गाड्या तातडीने बंद करण्यात येतील, असेही ते म्हणाले. खरेतर, चीन ही जगातली गाड्यांसाठीची सगळ्यात मोठी बाजारपेठ. त्यातच सध्या इलेक्ट्रिक कार निर्मितीच्या क्षेत्रात इथे प्रचंड चढाओढ चालू आहे. गेल्या वर्षी टेस्ला कंपनीने आपल्या १,४७,४४५ गाड्या ह्या बाजारपेठेत विकल्या. चीनच्या ‘निओ इंक’कडून टेस्लाला जोरदार स्पर्धा  आहे. अलास्कामध्ये सध्या चीन आणि अमेरिकेच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका चालू असतानाच हा वाद 
उभा राहिला आहे. जो बायडेन  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिका आणि चीनमध्ये चर्चेची सुरुवात झालेली आहे. “अशा काळात दोन्ही देशांनी परस्पर विश्वासाचे अधिक घट्ट नाते निर्माण करायला हवे आहे,” असे आवाहनदेखील एलॉन मस्क ह्यांनी केले आहे. अमेरिका आणि चीनच्या संबंधावरती ह्या वादंगाचा काय परिणाम होतो हे बघणे औत्सुक्याचे असेल.

- प्रसाद ताह्मणकर (prasad.tamhankar@gmail.com)

 

Web Title: Thief's vomit bomb! China's eye on Tesla's cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन