देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार म्हणून ओळखली जाणारी एमजी मोटर्सची कॉमेट ईव्ही कार पुन्हा एकदा महागली आहे. एमजीने या वर्षातील तिसरी दरवाढ केली आहे. यावेळी १५००० रुपयांनी या कारची किंमत वाढविण्यात आली आहे.
यामुळे या कारची किंमत 7.50 लाख रुपये झाली आहे. या किंमतीतही ही कार सर्वात स्वस्तच आहे. कंपनी बॅटरी भाड्याने देण्याची स्कीमही राबवत आहे. यानंतर तर कार आणखीनच स्वस्त पडते, परंतू प्रति किमी ठराविक पैसे कंपनीला भाडे द्यावे लागते.
एमजी कॉमेटचे बेस मॉडेल एक्झिक्युटिव्हची किंमत १४,३०० रुपयांनी वाढली आहे. तर एक्साईट आणि एक्सक्लुझिव्ह मॉडेल्सच्या किमती १५,००० रुपयांनी वाढल्या आहेत. यानंतर या मॉडेल्सच्या किंमती अनुक्रमे ८.५७ लाख रुपये आणि ९.५६ लाख रुपये झाल्या आहेत. सर्वात महाग असलेली ब्लॅकस्टॉर्म एडिशन 13,700 रुपयांनी वाढून १० लाख रुपये एक्स शोरुम किंमतीला मिळणार आहे.
BaaS या बॅटरी भाडेतत्वावर घेण्याच्या योजनेत या किंमती जवळपास २.५ लाख रुपयांनी कमी आहेत. एक्झिक्युटिव्हची किंमत ४.९९ लाख रुपये, एक्साईटची ६.२० लाख रुपये आणि एक्सक्लुझिव्ह मॉडेलची किंमत ७.२० लाख रुपये आहे. ज्यांचा वापर कमी आहे, त्यांच्यासाठी बास योजना योग्य आहे. कारण तुम्हाला जेवढे किमी चालवाल तेवढे महिन्याला भाडे द्यावे लागणार आहे.