रॉयल एनफिल्ड कंपनीच्या गाड्यांची ग्राहकांमध्ये क्रेझ आहे. यात कंपनीच्या रॉयल एनफिल्ड हंटर 350 ने ग्राहकांना अधिक आकर्षित केले आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत कंपनीने रॉयल एनफिल्ड हंटर 350 च्या दोन लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. रॉयल एनफिल्डने मंगळवारी सांगितले की, आपल्या हंटर 350 बाईकने लाँच झाल्यानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत एकूण दोन लाख युनिट्सचा आकडा पार केला आहे.
रॉयल एनफिल्डने एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये हंटर 350 मॉडेल सादर केले होते, या मॉडेलने फेब्रुवारी 2023 मध्ये 1 लाख युनिट्सच्या विक्रीचा आकडा गाठला होता आणि केवळ 5 महिन्यांत पुढील 1 लाख युनिट्सची विक्री नोंदवली आहे. रॉयल एनफिल्डचे सीईओ बी गोविंदराजन म्हणाले, "आम्हाला अभिमान आहे की लाँच्या 1 वर्षांपेक्षा कमी कालावधीत हंटरने जगभरातील दोन लाखांहून अधिक रायडर्सना जोडले आहे. हंटर 350 ची लोकप्रियता केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वेगाने वाढत आहे."
रॉयल एनफिल्ड हंटर 350 बाईकची किंमत 1.50 लाख ते 1.69 लाख रुपयापर्यंत (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. ही बाईक रेट्रो हंटर आणि मेट्रो हंटर या दोन व्हेरिएंटमध्ये येते. या बाईकमध्ये 349 सीसी सिंगल सिलिंडर 4-स्ट्रोक एअर-कूल्ड इंजिन दिले आहे, जे 20.2 पीएस पॉवर आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. बाईकचे कर्ब वजन 181 किलो आहे, तर त्याची इंधन टाकी क्षमता 13 लीटर आहे.
कंपनीचा दावा आहे की, ही बाईक 36.5 किमी/लीटरचे सर्टिफाइड मायलेज देते. बाईकला समोरील बाजूस टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागील बाजूस ट्विन शॉक ऍब्जॉर्बर सस्पेन्शन आहे. ब्रेकिंगसाठी समोर 300 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 270 मिमी डिस्क ब्रेक आहेत. तसेच, यात 17-इंचाचे स्पोक आणि अलॉय व्हील (व्हेरिएंटनुसार) आहेत.