कार घ्यायची तर कोणती घ्यायची यापेक्षा आपली कार उभी कुठे करायची हा मोठा प्रश्न सध्या मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये आहे. रस्त्याची रुंदी फार मोठी नाही, नव्या वसाहतींमध्ये वा इमारतींमध्ये कार, मोटारसायकल पार्किंगसाठी सुविधा निर्माण केल्या जात असल्या तरी जुन्या इमारतींची संख्या कमी नाही, तेथे राहाणाऱ्या अनेकांकडे कार आहे, काहींची ऐपत असूनही कार घेता येत नाही, कारण त्यांच्याकडे कार पार्किंगची व्यवस्था नाही. मुंबईमध्ये पुण्यासारखी स्थिती नाही. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात अनेक नव्या इमारती व निवासी संकुले उभी राहिली पण त्या इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था आहे. तरीही पाहुण्यांसाठी पार्किंग नाही, असे अगदी सुस्पष्ट चित्र आहे. पुण्यामध्ये शहर वाढले तरी रस्ते फार सोयीस्कर नाहीत, अर्थात जुन्या पुण्यात पार्किंगची समस्या आहे. आजही ती असल्याचे स्पष्ट जाणवते. तुळशीबागेत जायचे झाले तर मंडईत कारपार्किंग (car parking) उभे केले आहे तेथे कार पार्क करावी लागते. अर्थात ती जागाही अपुरी पडू लागली आहे. दुचाकींची संख्या तर अगणित झाल्यासारखी आहे.एकूण काय पुणे घ्या किंवा मुंबई कार पार्किंग ही एक समस्या बनली आहे. त्यामुळेच कार घ्यायची इच्छा असली तरी प्रथम पार्किंगचा प्रश्न निस्तरावा लागतो. वाढत्या लोकसंख्येला आणि वाहनांच्या संख्येला अद्याप तरी आळा घालणे पुण्या-मुंबईत जमलेले नाही. घराजवळचे पार्किंग हा जसा एक विषय आहे तसाच कामाच्या ठिकाणीही आहेच वाढत्या वाहतुकीमुळे वाहन पार्किंगसाठी कार्यालयीन कंपन्यांकडेही स्वतःची जागा असली तरी त्या ठिकाणी मर्यादा असते. पुण्यात वा मुंबई बाहेर काही कार्यालये मात्र पार्किंगसाठी उपलब्ध जागा देऊ करीत असतीलही पण एकंदर वाढ व आवाका पाहाता, सर्व वाहनांना पार्किंगमध्ये सामावून घेण्यासारखी परिस्थिती सध्या तरी नाही. भविष्यात ती आणखी बिकट होण्याची अवस्था आहे.पार्किंग ही वाहनाची व वाहन मालकाची गरज आहे. सार्वजनिक प्रभावी वाहतूक व्यवस्था नसल्याने व वाढत्या लोकसंख्येला ही वाहतूक व्यवस्था पुरेशी नसल्यानेच वाहतुकीच्या कोंडीतूनही मार्ग काढून कुठेतरी अंग चोरल्यासारखे उभे राहावे तसे पार्किंग शोधून वाहन बाळगण्याखेरीज गत्यंतर नाही, अशी ही महानगरांची अवस्था आहे. अपरिहार्यता असल्याने वाहन घेऊच नये, असे म्हणणेही चूक म्हणावे लागेल. तरुणांप्रमाणेच प्रौढच काय पण वृद्धत्वाकडे झुकू लागलेल्यांचीही कार ही केवळ इच्छा, सुविधा वा हौस नसून गरज बनू लागली आहे. फक्त कारच्या आशा-अपेक्षांप्रमाणेच पार्किंगसाठीही आता मनोरे बांधावे लागणार आहेत.
पार्किंगचे मनोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:09 IST