टेस्लाला तब्बल दीड लाख वाहने परत मागवण्याचे निर्देश; नेमके कारण काय? वाचा
By देवेश फडके | Updated: January 14, 2021 13:22 IST2021-01-14T13:20:29+5:302021-01-14T13:22:16+5:30
आरामदारी वाहनांच्या निर्मितीत जगभरात आघाडीवर असलेल्या टेस्ला कंपनीला अमेरिकेतील तब्बल दीड लाख चारचाकी वाहने परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग रहदारी सुरक्षा प्रशासनाकडून हे निर्देश दिले गेले आहेत.

टेस्लाला तब्बल दीड लाख वाहने परत मागवण्याचे निर्देश; नेमके कारण काय? वाचा
वॉशिंग्टन : आरामदारी वाहनांच्या निर्मितीत जगभरात आघाडीवर असलेल्या टेस्ला कंपनीला अमेरिकेतील तब्बल दीड लाख चारचाकी वाहने परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रायटर्सने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
अमेरिकेत Tesla Inc कडून उत्पादन करण्यात आलेल्या Model-S आणि Model-X या वाहनांना परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या वाहनांची निर्मिती अनुक्रमे २०१२ ते २०१८ आणि २०१६ ते २०१८ या कालावधीत करण्यात आली होती. टेस्लाच्या या मॉडेलमध्ये मीडिया कंट्रोलमध्ये बिघाड झाल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मीडिया कंट्रोलमध्ये झालेल्या बिघाडामुळे टचस्क्रीन काम करत नाही, अशी तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे. मीडिया कंट्रोलमध्ये बिघाड असलेल्या वाहनांची संख्या १ लाख ५८ हजारांवर असल्याचे सांगितले जात आहे.
वास्तविक पाहता वाहनांमध्ये एखादा बिघाड मोठ्या प्रमाणावर आढळून आल्यास वाहन कंपनी या तक्रारींची स्वतःहून दखल घेत असते आणि संबंधित वाहने परत मागवत असते. मात्र, रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील राष्ट्रीय महामार्ग रहदारी सुरक्षा प्रशासन असलेल्या NHTSA ने अधिकृतरित्या पत्र लिहून टेस्लाला वाहने परत मागवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या पत्रावर टेस्ला कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. असे असले तरी २७ जानेवारीपर्यंत टेस्लाला यावर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
रस्ते सुरक्षा नियामक प्राधिकरणाने अमेरिकेतील उपरोक्त दोन्ही मॉडेल्सची गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात सुरक्षा तपासणी केली होती. या सुरक्षा तपासणीनंतर टेस्ला कंपनीला पत्र लिहिण्यात आले आहे. टचस्क्रीनमध्ये बिघाड झाल्याने काही सुरक्षासंदर्भातील अडचणी निर्माण होऊ शकतात. यामध्ये पुढील आणि मागील बाजूचा कॅमेरा काम करत नसल्याचेही समोर आले आहे. दाट धुक्यातून मार्गक्रमण करताना मीडिया कंट्रोल खराब झाल्याने काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते, असे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.