मारुती सुझुकीने दोन महिन्यांपूर्वी कारच्या किंमतीत मोठी वाढ केली होती. आता पुन्हा एकदा मारुती आपल्या ग्राहकांना मोठा झटका देण्याची तयारी करत आहे. एप्रिलपासून मारुती सुझुकीच्या वाहनांच्या किंमतीत ४ टक्क्यांपर्यंत वाढ केली जाणार आहे. वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घेतल्याचे कंपनीने कळविले आहे.
सोमवारी मारुतीने याची माहिती दिली आहे. देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, वाढत्या इनपुट खर्च आणि ऑपरेटिंग खर्चाच्या पार्श्वभूमीवर, कंपनी एप्रिलपासून आपल्या कारच्या किमती वाढवण्याची योजना आखत आहे. ही दरवाढ कारच्या मॉडेलनुसार असणार आहे.
खर्च कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, तसेच ग्राहकांवर बोजा पडू नये म्हणून काम करत आहोत. परंतू, आता वाढलेल्या खर्चाचा काही भाग बाजारपेठेत हस्तांतरित करावा लागू शकतो असे मारुतीने यात म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे मारुतीने १ फेब्रुवारीलाच कारच्या किंमती 4 टक्क्यांनी वाढविल्या होत्या. तेव्हाही कंपनीने वाढलेला खर्च कारण दिले होते. यावेळी कंपनीने कारच्या किंमतीत मॉडेलनुसार ३२५०० रुपयांपर्यंतची वाढ केली होती. आता देखील यासारखीच मोठी वाढ केली जाणार आहे. असे झाले तर कारच्या किंमती गगणाला भिडणार आहेत. अन्य कंपन्या देखील मारुतीच्या पावलावर पाऊल ठेवण्याची शक्यता असून त्या देखील कारच्या किंमती वाढविण्याची शक्यता आहे.
मारुतीच्या या घोषणेचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. आज मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये २ टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या हे शेअर 11,737 रुपयांवर आहेत. लाखोमध्ये खप असलेल्या मारुतीकडे सध्या एकच कार फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगवाली आहे.