प्रथमोपचार साधने, टॉर्च, मऊ डस्टर आदी इमर्जन्सी साधने प्रत्येक कारमध्ये हवीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 15:56 IST2017-08-17T18:27:03+5:302017-08-18T15:56:20+5:30
कारमध्ये प्रथमोपचारासाठी जसा परिपूर्ण साहित्य व साधनांची आवश्यकता ्सते, त्याचप्रमाणे कारमध्ये लांबच्या प्रवासात छोट्या छोट्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठीही काही वस्तू कारमध्ये असणे आवश्यक आहे. तुमच्या सोयीनुसार त्या साधनांमध्ये तुम्ही आणखीही भर घालू शकता.

प्रथमोपचार साधने, टॉर्च, मऊ डस्टर आदी इमर्जन्सी साधने प्रत्येक कारमध्ये हवीतच
प्रवासी असो की मालवाहतुकीची वाहने, मग ती कार असो की ट्रक, बस असो की स्कूटर वा मोटारसायकल यामध्ये काही तातडीची साधने नेहमीच ठेवली जाणे अतिशय गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे आज प्रत्येक नवीन कार, मोटारसाकल वा स्कूटर घेताना कंपनीकडून प्रथमोपचाराचे साहित्य असलेली एक छोटीशी बॅग वा पिशवी दिलीच जाते. नियमानुसार त्यात असलेली साधने ही तशी कमीच आहेत. पण प्रत्येकाने आपल्या सुरक्षिततेसाठी ती ठेवली पाहिजेत. केवळ आपल्यातच नव्हे तर एखाद्या सहवाहनाच्या कामालाही ती येऊ शकतात. शोरूममधून वाहन घेताना दिलेल्या या प्रथमोपचाराच्या साहित्यातही भर घालणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे काही अशी साधनेही असतात की, ती तुम्हाला अनेकदा नव्हे तर वारंवार लागत असतात. उपयोगाला येत असतात. संकटसमयी, अपघातसमयी या साधनांचा उपयोग होत असतो. कारमध्ये जसे टायर पंक्चर झाल्यानंतर स्टेपनी लावण्यासाठी जॅक, पाना आदी हत्यारे असणे आवश्यक आहे, तसेच ही तातडीची वा आणीबाणीच्या प्रसंगाची साधनेही आवश्यक आहेत.
प्रथमोपचाराच्या साहित्यामध्ये एक अंगदुखीची वा तापाची गोळी असलेले पॅकेट, जखमेवर लावण्यासाठी औषधे, क्रेप बॅण्डेज, गॉझ, कापूस, पेनकीलर गोळ्या, मलम, स्प्रे आदी औषधोपचार साहित्य दिलेले असते. यामध्ये असलेली औषधेही गरजेची आहेतच पण त्यात आणखीही काही भर घालून प्रत्येकाने आपल्या कारमध्ये वा वाहनामध्ये ही प्रथमोपचार पेटी सज्ज व अद्ययावत ठेवायला हवी. त्यामध्ये अॅलोपाथीमधील पॅरासिटेमॉलच्या गोळ्यांचे पाकिट (ताप, डोकेदुखी आदीसाठी) पेनकिलर मलम वा स्प्रे, गॉझ, जंतूनाशक द्रावण, कापूस, जखमेवर लावण्याची पट्टी, मध्यम आकाराचे क्रेप बॅण्डेज, गरम पाण्याची छोटी पिशवी, पित्तशामक गोळ्यांचे पाकिट, उलटी न होण्यासाठी गोळी, पिण्याच्या पाण्याची बाटली, कात्री किमान या साधनांनी प्रथमोपचाराची पिशवी सज्ज ठेवावी. एक्स्पायरी डेड झालेल्या औषधांना लगेच बाजूला करून नवी न औषधे त्या जागी ठेवावीत.
औषधांप्रमाणेच काही वस्तू या अगदी छोट्या कारणांसाठीही हाताशी असलेल्या चांगल्या असतात. यामध्ये टॉर्च, कापडाचे पातळ फडके, पेपर नॅपकिन्स, टॉवेल, पाणी स्प्रे ने उडवता येते अशी प्लॅस्टिक बाटली, हवेची उशी या किमान बाबी कारमध्ये असतील तर अनेक बाबतीत तुम्हाला त्याचा वापर करता येतो. त्यामुळे अडचणीच्यावेळी हाताशी असलेल्या या वस्तुंमुळे काच पुसणे, हात धुणे, रात्रीच्यावेळी टायरमधील हवा पाहाण्यासाठी वा डिक्कीतील सामान पाहाण्यासाठी वा अनोळख्या ठिकाणी पाय ठेवताना विशेष करून ग्रामीण भागात टॉर्चचा वापर करता येतो. कदाचित काहींना हे हास्यास्पदही वाटण्याची शक्यता आहे. पण या सर्व वस्तू इमर्जन्सीला ज्या प्रकारे उपयोगाला येतात, त्यामुळे प्रवासातील त्रासातून काही ना काही प्रमाणात सुटका करून घेणे शक्य होते.