Road Safety : भारतातील बहुतांश लोक आजही बाईक चालवताना हेल्मेट घालणे किंवा कार चालवताना सीट बेल्ट लावणे, यांसारखे नियम पाळत नाहीत. दरम्यान, आता भारतातील रस्ते सुरक्षा बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी प्रत्येक दुचाकीस्वाराला दोन ISI प्रमाणित हेल्मेट देणे बंधनकारक केले आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या ऑटो समिटमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला.
सरकारच्या या निर्णयाला भारतीय दुचाकी हेल्मेट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. गडकरींनी दिलेले हे कठोर निर्देश उद्योगासाठी एक महत्त्वाचे आणि बहुप्रतिक्षित पाऊल मानले जात आहे. यामुळे अकाली मृत्यू रोखण्यास मदत होईल. आयएसआय प्रमाणित हेल्मेट सक्तीची मागणी करणाऱ्या टू-व्हीलर हेल्मेट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (THMA) या निर्णयाचे कौतुक केले.
भारतातील रस्ते अपघातांची आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे. दरवर्षी 4,80,000 हून अधिक रस्ते अपघात होतात. यामध्ये 1,88,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागतो. यापैकी 66% मृत व्यक्ती 18 ते 45 वयोगटातील आहेत. विशेष म्हणजे, दरवर्षी 69,000 हून अधिक लोकांचा दुचाकी अपघातात मृत्यू होतो. या दुचाकी वाहनांच्या अपघातांपैकी 50% मृत्यू हेल्मेट न घातल्याने होतात.
यावर THMAचे अध्यक्ष राजीव कपूर म्हणाले, हा केवळ नियम नसून देशाची गरज आहे. ज्या कुटुंबांनी रस्ते अपघातात आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय आशेचा किरण आहे. रायडर आणि पिलियन रायडर, दोघांकडे आयएसआय प्रमाणित हेल्मेट असल्यास प्रवास सुरक्षित बनेल. हेल्मेट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने आश्वासन दिले की ते दर्जेदार आयएसआय हेल्मेटचे उत्पादन वाढवतील आणि त्यांची देशभरात उपलब्धता सुनिश्चित करतील.
आता 2000 रुपयांचे चलनभारत सरकारने मोटार वाहन कायदा 1998 मध्ये बदल केले आहेत. ज्यामध्ये दुचाकीस्वारांनी हेल्मेट न घातलेले किंवा ते नीट परिधान न केल्यास 2,000 रुपयांपर्यंतचा तात्काळ दंड आकारला जाईल.