वैयक्तिक वापराचे वाहन ही मालमत्ता नाही, आर्थिक गुंतवणूक नाही. वाहनाचा वापर हा तुमच्या रोजच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. तुम्ही स्वतःचे वापरा वा भाड्याचे वाहन वापरा. कार, बस, टॅक्सी, स्कूटर वा मोटारसायकल तुमच्या प्रवासाचे हे साधन तुमच्या सुरक्षित आयुष्याशीही निगडीत असते. कोणतेही वाहन योग्य विमा असल्याशिवाय रस्त्यावर आणता येत नाही. या वाहन विम्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. इतकेच नाही तो विमा रिन्यू करायचे विसरूनही जातात. पण त्यांच्या एक लक्षात येत नाही, की जर अपघात झाला तर आर्थिकदृष्ट्या थोडंफार सावरायला मदतीला विमाच येतो. विमा म्हणजे तुमच्यासाठी, कारसाठी तुम्हीच काढलेली एक सुरक्षितता असते. तेव्हा कारविम्याविना रस्त्यावर आणणे हा धोकादायक प्रकारच नव्हे तर गुन्हाही आहे. अपघात झाला तर तुमच्या वाहनाचे नुकसान होऊ शकते, दुसऱ्याच्या वाहनाचे वा मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. इतकेच नव्हे तर तुमच्या, तुमच्या कुटुंबीयांच्याच नव्हे तर अन्य एखाद्या व्यक्तीच्या प्राणालाही धोका निर्माण होऊ शकतो. तसे झाले तर होणारे काही वस्तुंचे नुकसान एकवेळ कुठूनतरी भरून काढताही येऊ शकते, मात्र एखाद्याच्या शरीराचे नुकसान भरून काढता येणार नाही. तरीही त्याच्या उपचारासाठी, नुकसानभरपाईसाठी आर्थिक किंमत मोजावी लागत असते. यासाठी मुळातच वाहन सुरक्षित चालवणे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, पण त्याचप्रमाणे त्या वाहनाचा विमा असणे हे देखील आवश्यक आहे.आज वाहन विम्यामधून दिले जाणारे फायदे काही प्रमाणात वाढलेले आहेत. मुख्य प्रकार दोन आहेत एक म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह व दुसरा थर्ड पार्टी विमा (comprehensive insurance and third party insurance) यामध्ये पहिल्या प्रकारच्या म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह विम्यामध्ये तुमच्या मोटारीला अपघात झाला तर मिळणारा विम्याच्या व मोटारीच्या किंमतीच्या अनुषंगाने ठरवलेल्या किंमतीनुसार निश्चित केलेला भाग इन्शुअर्ड असतो. त्यात वाहनाचे नुकसान, वाहनामधील चालकासह प्रवासी व्यक्तीचे नुकसान, हानी, प्राणहानी, तसेच तुमच्याप्रमाणेच अपघातामध्ये संलग्न असलेल्या अन्य व्यक्ती व वाहनाचीही जबाबदारी, वाहनाची चोरी यांचा समावेश असतो.थर्ड पार्टी विम्यामध्ये मात्र तुमच्या मोटारीमुळे अन्य वाहन वा व्यक्तीचे नुकसान झाले तर त्याची जबाबदारी ही विम्याच्या अंतर्गत इन्शुअर्ड असते. ज्या दिवशी तुम्ही विमा काढता साधारण त्या दिवसापासून बरोबर एक वर्षासाठी हा विमा असतो. तो विमा अखेरच्या दिवसाच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असतो. त्यानंतर काही अपघात वा दुर्घटना घडली तर तो विमा लागू पडत नाही. नुकसानभरपाई देण्यासाठी त्यानंतर विमा कंपनी बांधील नसते. यासाठीच विमा काढल्यानंतर तो संपण्यापूर्वीच त्याचे नूतनीकरण करण्याची नोटिसही तुम्हाला विमा कंपनी पाठवते, अगदी मेल व एसएमएसही करते. त्यानुसार वेळेपूर्वीच विम्याची रक्कम भरली गेली तर तो विमा आपोआप संपलेल्या दिवसाच्या मध्यरात्रीनंतर म्हणजे लगोलग कायम राहातो. वेळेवर विमा भरला नाहीत, तर तुम्हाला त्यासाठी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यासमोर ते वाहन उभे करणे, वाहनाची सर्व कागदपत्रे तुम्ही त्याच्यासमोर सादर करणे गरजेचे असते. नूतनीकरण वेळीच केल्यास ही सारी धावपळ वाचते. नोक्लेम बोनसही नव्या विम्याच्या रक्कमेत अॅडजेस्ट होतो. तेव्हा कार विम्याला पर्याय नाही हे पक्के लक्षात ठेवा.
विम्याला पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:09 IST