मनामध्ये कार घ्यायचे पक्के केलेच आहे. बँक, खिसा, कर्ज, पार्किंगचा प्रश्न याचाही बॅलन्स चांगला जमला आहे पण तरीही प्रश्न आहे तो कार घ्यावी कोणती? हॅचबॅक (HATCHBACK) , सेदान (SEDAN) की एसयूव्ही (SUV)... काही महत्त्वाचा बॅलन्स जमला तरी व्यवहार्यतेचा समतोल साधला जाणे गरजेचा आहे, हे लक्षात घेऊनच कारची निवड करायला हवी. तुम्ही कार कुठे वापरणार, किती वापरणार, किती काळासाठी कार वापरण्याची तयारी आहे, फक्त शहरात की शहराबाहेरही, लाँग ड्राईव्हला गावाकडे जाणार का, तुम्ही एकटेच ड्राईव्ह करणार की कुटुंबालाही तुमच्या आनंदात नेहमी सामावून घेणार आहात? अशा एक नाही अनेक प्रश्नांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे. या प्रश्नांची उत्तरे तुम्हालाच शोधावी लागतील. कारण इच्छेपेक्षा या ठिकाणी सर्वप्रथम व्यवहार्यता हीच गरजेची ठरली आहे.शहरात तुम्ही स्वतः ड्राईव्ह करणार असाल तर तुमच्या कौशल्यावर तुम्ही काय तो निर्णय घ्यावा. तशीच तर वाहतुकीची स्थिती झाली आहे. त्यासाठी शहरातील तुमच्या नेहमीच्या रस्त्यांचा वापर, पार्किंग समस्या, वाहतूक कोंडीतून सुटकेसाठी योग्य रस्ता याचा विचार करावा. यामुळे कार घेतल्यानंतर अनेक बाबी सुकर होतील. आधी कार वापरणारेच असाल तर या साऱ्या बाबींची तुम्हाला पूर्ण कल्पना आधीच आलेली असेल. छोट्या वा मध्यम हॅचबॅक वास्तविक शहरामधील वाहतूककोंडीमध्ये बरी म्हणायची वेळ येते. अर्थात शोफर असेल तर मात्र तुमच्या डोक्याला व्याप नसतो, पण तरीही हॅचबॅक आकाराने आटोपशीर असल्याने वाहतूककोंडीमध्ये सोयीस्कर. मोठ्या सेदान वा एसयूव्हीकडे तो आकाराचा आटोपशीरपणा नाही, त्या पॉवर स्टिअिरंगमुळे सोपी वाटली तरी आकार काही संकोच पावू शकत नाहीत. नोचबॅक पद्धतीच्या मध्यम आकाराच्या कॉम्पॅक्ट सेदान कार शहरी वाहतुकीत काहीशा हॅचबॅकला पर्याय ठरू शकतात. यामुळेच ज्यांना शहरी प्रवासासाठी हॅचबॅक नको पण शहरात असूनही सेदान हवी आहे, त्यांना नोचबॅक – कॉम्पॅक्ट सेदानचा पर्याय नक्कीच चांगला आहे. साधारण चार मीटरच्या दरम्यान असलेल्या या कॉम्पॅक्ट सेदानने शहरी वाहतूक कोंडीत सहजता स्वीकारलेली आहे. तसेच शहराप्रमाणेच बाहेर लाँग ड्राइव्हला जाण्यासाठीही इंजिनाची ताकद व इंधनक्षमता व बऱ्यापैकी ऐसपैस जागा घेत या नोचबॅक सेदानने शहरी वाहतुकीतही स्थान पटकावले आहे. फक्त निवड तुम्हीच करायची आहे व्यवहार्य कार कोणती ? नोचबॅक म्हणजे डिक्की लांबीला कमी पण हॅचबॅकपेक्षा लगेजस्पेस जास्त देणारी तसेच मध्यम हॅचबॅकपेक्षा थोडी जास्त रक्कम मोजूनही काहींना व्यवहार्य वाटते तर काहींना छोटी हॅचबॅकच अधिक सोयीस्कर वाटते. अर्थात हा प्रश्न मात्र व्यवहार्यतेबरोबरच प्रत्येकाचा आवडी-निवडीचा ठरू शकतो.
हॅचबॅक की नोचबॅक ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:10 IST