- हेमंत बावकर
पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी वाहनांवरील जीएसटी कमी झाल्याचा फटका इलेक्ट्रीक वाहनांना बसण्याची दाट शक्यता आहे. कारण आधीच इलेक्ट्रीक वाहनांच्या तुलनेत स्वस्त असलेल्या टू व्हीलर, कार या आणखी स्वस्त होणार आहेत. यामुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या कंपन्यांना त्यांच्या वाहनांच्या किंमती कराव्या लागण्याची किंवा डिस्काऊंट सुरु करावे लागण्याची वेळ येणार आहे.
इलेक्ट्रीक वाहनांवर जीएसटी ५ टक्केच ठेवण्यात आला आहे. शिवाय राज्य आणि केंद्राची सबसिडी मिळत आहे. आरटीओ टॅक्स नाहीय, तरीही इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती या पेट्रोल, डिझेलच्या वाहनांपेक्षा जास्तच आहेत. अशातच दुचाकींच्या किंमती या १० ते २० हजार रुपयांनी कमी होत आहेत. तर कारच्या किंमती या ६० ते १.५० लाख रुपयांनी कमी होत आहेत. यामुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीसाठी कितीही नाही म्हटले तरी कंपन्यांना धडपड करावी लागणार आहे.
इलेक्ट्रीक वाहनांची विक्री आधीच कमी होत चालली आहे. त्यात आता इंधनावरील वाहनांच्या किंमती कमी होणार आहेत. यामुळे इंधनावरील वाहनांची विक्री चांगलीच वाढणार आहे. अनेकजण किंमत कमी होण्याची वाट पाहत आहेत. सध्या या कंपन्यांच्या शोरुममध्ये शुकशुकाट आहे. आताची किंमत आणि कमी होणारी किंमत याचा अंदाज घ्यायला लोकांचे फोन येत आहेत. अशावेळी या शोरुमना दैनंदिन खर्च आधीच्या पैशांतून करावा लागत आहे. बँकांचे कर्जप्रकरण करणारे प्रतिनिधी देखील रिकामे बसून आहेत. २२ सप्टेंबरनंतर या कर्मचाऱ्यांना जोरदार काम करावे लागणार, जास्त कुमक ठेवावी लागणार असल्याचे काही शोरुम मालकांनी सांगितले आहे.
सध्या १ लाखाला मिळत असलेली अॅक्टीव्हा ही ९० हजाराला मिळणार आहे, ज्युपिटरची किंमतही तशीच कमी होणार आहे. यामुळे त्याच्या तुलनेत टीव्हीएस आयक्यूब, एथर रिझ्टा, बजाज चेतक या ईलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीमधील फरक हा वाढणार आहे. याचा थेट परिणाम इलेक्ट्रीक स्कूटरवर होणार आहे. इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत एकतर कंपन्यांना कमी करावी लागणार किंवा स्कूटरवर तसेच कारवर मोठमोठे डिस्काऊंट द्यावे लागणार आहेत. त्यातच फेस्टिव्हल सीझन आहे, यामुळे ईव्ही कंपन्या डिस्काऊंटही जारी करण्याची शक्यता आहे.
कारच्या किंमतीत मोठी तफावत...
या सारखाच फटका ईलेक्ट्रीक कारना देखील बसणार आहे. टाटा नेक्सॉनचे उदाहरण घ्यायचे झाले तर सध्या नेक्सॉन ७.९९ ते १५ लाखांना मिळते. तर ईव्ही नेक्सॉन बॅटरी क्षमतेनुसार १३ ते २० लाखांना मिळते. आता जीएसटीमुळे नेक्सॉनच्या किंमती ८० हजार ते १.५ लाखांनी कमी होणार आहेत. यामुळे या दोन्ही प्रकारातील किंमतीतील दरी आणखी वाढणार आहे. याचा परिणाम जे काठावर आहेत, त्यांच्यावर जाणवणार असून अनेकजण पेट्रोल, सीएनजी, डिझेल कारकडे वळण्याची शक्यता आहे.