ओला ईलेक्ट्रीक स्कूटरचे दिवस सरले असे जुलै महिन्यातील विक्रीच्या आकड्यांवरून वाटू लागले आहे. ओलाने इलेक्ट्रीक स्कूटरच्या सोबतीला ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणून आता तीन-चार महिने झाले आहेत. परंतू ओलाला खरेदीदारच मिळेनासे झाले आहेत. जुलैमध्ये ओलाने कसाबसा तिसरा क्रमांक राखला आहे. एथरने थोडी जरी जास्त विक्री केली असती तर ओलाचा चौथ्या नंबरवर जावे लागले असते अशी परिस्थिती आता भाविश अगरवालांच्या कंपनीवर आली आहे.
टीव्हीएस आयक्युबने पहिला क्रमांक अबाधित ठेवला आहे. आयक्यूबच्या 22,242 गाड्या विकल्या गेल्या आहेत. तर बजाज ऑटोने 19,669 स्कूटर विकल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ओला असून 17,850 युनिट विकले आहेत. एथरने याच महिन्यात 16,241 गाड्या विकल्या आहेत.
ओलाने गेल्या वर्षी जुलै महिन्यात 44000 स्कूटर विकल्या होत्या. त्याच्या तुलनेत ओलाला निम्म्या देखील विकता आलेल्या नाहीत. एथरनंतर हिरोच्या विडा ब्रँडचा नंबर लागत आहे. विडाने 10,495 स्कूटर विकल्या आहेत. हिरो येत्या काही महिन्यात आणखी जास्त विक्रीचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. कारण विडाने वीएक्स२ सिरीज ही बास सबस्क्रीप्शनची आणली आहे. यानंतर नंबर लागतो तो ग्रीव्हजचा, या कंपनीने ४००० स्कूटर विकल्या आहेत.
बाकी प्युर, बीगॉस, रिवर, कायनेटीक या कंपन्यांना १२०० ते १५०० चा आकडा गाठता आला आहे. रिव्होल्ट, ओबन यासारख्या कंपन्यांना १००० चा आकडाही गाठता आलेला नाहीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ टक्क्यांनीच ईलेक्ट्रीक स्कूटरची विक्री घसरलेली आहे, परंतू प्लेअर्स मात्र मोठ्या प्रमाणावर बदललेले आहेत. ओलाचा पहिला नंबर आता तिसरा आला असून चांगली वाढ झाली नाही तर चौथ्या, पाचव्या क्रमांकावर देखील भविष्यात घसरण्याची शक्यता आहे.