पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण केल्याने जुन्या गाड्यांच्या इंजिनामध्ये समस्या येत आहेत, मायलेज कमी झाले आहे असे दावे केले जात होते. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्या वाहनाला समस्या येत असेल त्यांनी दाखवावी असे एकप्रकारे चॅलेंजच दिले होते. आधीच वाहना मालकांमध्ये यावरून खळबळ उडालेली असताना आता टोयोटाचे मोठे वक्तव्य आले आहे.
टीम बीएचपीच्या फोरमवर सुरु झालेल्या चर्चेत टोयोटाने ई १० च्या वाहनांमध्ये ई २० इथेनॉल पेट्रोल वापरू नका असा सल्ला दिला आहे. यामुळे आता या इंधनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहेत. एका युजरने अर्बन क्रूजरमध्ये E20 पेट्रोल वापरणे योग्य आहे का असा सवाल केला होता. तिथे टोयोटाच्या सपोर्ट टीमने हे उत्तर दिले आहे.
केवळ मायलेज कमी होणे हा एकच प्रकार नाहीय, तर जर गाड्यांच्या इंजिनमध्ये बिघाड झाला तर त्यावर कंपन्या वारंटी देतील का? की इंजिन दुरुस्तीसाठी लाख, दोन लाखांचे बिल भरावे लागणार यावरून देखील वाहन मालक चिंतेत आहेत. इन्शुरन्स कंपन्या देखील वाहनांना इंजिन प्रोटेक्शन देतात, त्या देखील ते नाकारू शकणार आहेत.
अर्बन क्रूझरच्या प्रश्नावर टोयोटा कंपनीने, सरळ नाही असे म्हट ले आहे. ओनर मॅन्युअलमध्ये म्हटल्यानुसारच इंधन भरा नाहीतर चुकीच्या इंधनामुळे झालेले नुकसान वॉरंटीमध्ये कव्हर केले जाणार नाही, अशा शब्दांत टोयोटाने इशारा दिला आहे. टाटा मोटर्सने त्यांच्या सर्व गाड्या E20वर चालू शकतात असे म्हटले आहे. बजाजने त्यांच्या जुन्या गाड्यांमध्ये इंधन सिस्टीम क्लिनर वापरण्याचा सल्ला दिला आहे.