Car Insurance: राजधानी दिल्लीत महिंद्रा Thar एसयुव्हीचा झालेला अपघात सध्या चर्चेत आला आहे. महिलेच्या चुकीमुळे Thar शोरुमच्या पहिल्या मजल्यावरुन थेट रस्त्यावर कोसळली. महिलेने ही थार २७ लाख रुपयांना खरेदी केली होती. परंतु डिलिव्हरीच्या दिवशीच झालेल्या अपघातामुळे आनंदावर विरजण पडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या घटनेनंतर एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झालाय. तो म्हणजे, नवीन कारचा शोरुमबाहेरच अपघात झाला, तर विम्याची रक्कम मिळते का?
दिल्लीतील अपघात कसा घडला?
दिल्लीच्या निर्माण विहार परिसरातील महिंद्रा शोरुममध्ये ही घटना घडली. महिला तिच्या नवीन थारची डिलिव्हरी घेण्यासाठी आली होती. महिलेने पहिल्या मजल्यावर पार्क केलेल्या कारची पूजा केली आणि चाकाखाली लिंबू ठेवले. महिलेला चाकाद्वारे लिंबू फोडायचे होते, परंतु तिचे गाडीवरील नियंत्रण सुटले अन् कार थेट शोरुमच्या काचा फोडून खाली रस्त्यावर कोसळली. सुदैवाने कारच्या एअरबॅग्ज उघडल्यामुळे महिलेचा जीव वाचला. मात्र, या अपघातात कारचे खूप नुकसान झाले.
पाहा दिल्लीत झालेल्या अपघाताचा Video:-
विमा संरक्षण मिळेल का?
या घटनेनंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की, या नुकसानाची भरपाई करण्यासाठी महिलेला विमा मिळेल का? तर, नवीन कारची डिलिव्हरी होण्यापूर्वीच शोरुमकडून त्याचा विमा उतरवला जातो. हा खर्च ग्राहकाने उचलावा लागतो. म्हणजेच, तांत्रिकदृष्ट्या महिलेला गाडी दिल्यापासून त्याचा विमा सुरू झालेला असतो. म्हणूनच या प्रकरणात, महिलेला विमा दावा मिळू शकतो. मात्र, विमा कंपनी निश्चितपणे घटनेची चौकशी करेल.