Auto Expo 2023 : आशियातील सर्वात मोठ्या ऑटो एक्स्पोला (Auto Expo 2023) दिल्लीत सुरूवात झाली आहे. ऑटो एक्सपोच्या 16 व्या एडिशनला 'द मोटर शो' असे नाव देण्यात आलेय. या कार्यक्रमात मारुतीची कार हे पहिले आकर्षण होते. मारुतीने इलेक्ट्रीक SUV कॉन्सेप्ट EVX सादर केली. इमॅजिनेक्स्ट व्हिजनसह कंपनीने ती सादर केली. ही एसयूव्ही एका चार्जमध्ये 550 किमी रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मारुतीचा दावा आहे की कंपनीने तयार केलेल्या नवीन SUV मध्ये परफॉर्मन्ससह ॲडव्हान्स्ड कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतील. मारुतीनं पहिल्यांदाच आपले इलेक्ट्रीक वाहन सादर केले आहे. कंपनीने नवीन SUV च्या सादरीकरणासाठी मेटावर्सचा वापर केला. मारुतीने इलेक्ट्रीक एसयूव्ही उत्पादनासाठी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
एमजीने आणली नवी हेक्टरएमजी मोटर्सने ऑटो शोमध्ये आपल्या प्रीमियम कार हेक्टरचे फेसलिफ्ट व्हर्जन सादर केले. कंपनीने या मॉडेलमध्ये 11 नवीन फीचर्सचे आश्वासन दिले आहे. यात 11-इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. कंपनीने 5 आणि 7 सीटर मॉडेल्सच्या निरनिराळ्या व्हेरिअंट्सची किंमत 15 लाख ते 22 लाखांपर्यंत निश्चित केलीये.
अनेक कंपन्या एक्सपोपासून दूरयावेळी महिंद्रा अँड महिंद्रा, स्कोडा, फोक्सवॅगन आणि निसानसह लक्झरी वाहन कंपन्या मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू आणि ऑडी या ऑटो एक्सपोमध्ये दिसणार नाहीत. याशिवाय, हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो आणि TVS मोटर कंपनी या प्रमुख दुचाकी कंपन्यांची उपस्थिती इथेनॉल पॅव्हेलियनमध्ये त्यांच्या 'फ्लेक्स फ्युएल' प्रोटोटाइप वाहनांच्या प्रदर्शनापुरती मर्यादित असेल.