Witness Chitlange won gold in West Asian Chess Tournament | साक्षी चितलांगे हिने जिंकले पश्चिम आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण
साक्षी चितलांगे हिने जिंकले पश्चिम आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण

ठळक मुद्देजिंकले ११ वे आंतरराष्ट्रीय पदक : मिळवला वूमन ग्रँडमास्टर्सचा नॉर्म

औरंगाबाद : औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू साक्षी चितलांगे हिने भारताचे प्रतिनिधित्व करताना नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या पश्चिम आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत ज्युनिअर गटात ९ पैकी ७ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. साक्षीचे हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील नववे पदक ठरले आहे. त्याचबरोबर साक्षीने वुमन ग्रँडमास्टर्सचा पहिला नॉर्मदेखील मिळवला. तिने १६ आंतरराष्ट्रीय गुणांची कमाई केली.
गत वर्षी राष्ट्रीय ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यामुळे नवी दिल्ली येथे आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या जागतिक मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली आहे.
नवी दिल्ली येथील स्पर्धेत दहा देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. गतवर्षीही ज्युनिअर गटात विजेतेपद पटकावणाºया साक्षीने ए. बखोरा हिच्यावर १.५ आणि वंतिका हिच्यावर १ गुणाने आघाडी घेत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अखेरच्या फेरीआधी साक्षी व उजबेकिस्तानची ए. बखोरा या दोघीही ६.५ गुणांसह संयुक्तरीत्या आघाडीवर होत्या; परंतु बखोरा हिला अखेरच्या फेरीत पराभव पत्करावा लागल्याने साक्षी चितलांगे हिने एकूण ९ पैकी ७ गुणांसह सुवर्णपदक पटकावले.
साक्षीने तिसºया व चौथ्या डावात अनुक्रमे वुमन इंटरनॅशनल मास्टर आंकाक्षा हगवणे व वंतिका अग्रवाल यांच्यावर मात केली होती. पाचव्या फेरीत तिला उजबेकिस्तानची वुमन इंटरनॅशनल मास्टर ए. बखोरा हिच्याकडून पराभव पत्करावा लागला; परंतु त्यानंतर तिने सलग तीन विजयासह बखोरा हिच्यासह संयुक्तरीत्या आघाडी केली. अखेरच्या नवव्या फेरीत तिने सविता हिच्याबरोबरचा डाव बरोबरीत सोडवला. साक्षीने आतापर्यंत ३ सुवर्ण, ४ रौप्य व २ कास्यपदके जिंकली आहेत.


Web Title: Witness Chitlange won gold in West Asian Chess Tournament
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.