लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:05 AM2021-05-16T04:05:46+5:302021-05-16T04:05:46+5:30

सासर - माहेर वेगवेगळ्या शहरांत असणाऱ्या सासुरवाशिणी मात्र आता माहेरच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या आहेत. मागील वर्षीही ...

My mother-in-law is happy for Leki's Mahera .. | लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते..

लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते..

googlenewsNext

सासर - माहेर वेगवेगळ्या शहरांत असणाऱ्या सासुरवाशिणी मात्र आता माहेरच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या आहेत. मागील वर्षीही आई-वडिलांची, भाऊ-बहिणींची आणि भाच्चे मंडळींची भेट घेणे अनेकींना शक्य झाले नव्हते. यावर्षी तरी माहेरी जाता येईल, अशी आस होती; पण शेवटी यावर्षीही कोरोना माहेरची वाट अडवून बसल्याने सासरी नांदणाऱ्या लेकी आणि लेकींची वाट पाहणारी माऊली हिरमुसून गेल्या आहेत.

प्रतिक्रिया-

माझं माहेर माहेर...

१. हा विषय छेडून आमच्या मनातल्या दु:खाला वाट करून दिली गेली आहे. जानेवारी २०२० मध्ये मी माहेरी जळगावला जाऊन आले. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत कोरोना आला आणि आजपर्यंत मला माहेरी जाता आलेले नाही. मागच्यावर्षी वाटले होते, निदान दिवाळीला किंवा पुढच्या उन्हाळ्यात तरी जाता येईल; पण आता लहान मुलांवर कोरोनाचे संकट येणार आहे, तसेच हवेतून कोरोना जंतूचा प्रसार होत आहे, हे ऐकूण यावर्षीही माहेरी जाता येणार नाही.

- शुभा बिनीवाले

२. माझे माहेर मुंबई आहे. कोरोनामुळे मागीलवर्षी उन्हाळी सुट्यांमध्ये माहेरी जाऊन निवांत राहण्याचे सुख अनुभवता आलेले नाही. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात जाणे झाले होते; पण तेही अगदीच उभ्याउभ्या. यावर्षीही सगळीकडेच रुग्णसंख्या वाढू लागल्याने भीतीचे वातावरण आहे. एकतर माहेरी जाण्यासाठी पासही मिळत नाही, शिवाय मुलांना घेऊन इतक्या दूरचा प्रवास करण्याची भीतीही वाटते. त्यामुळे यावर्षीही फोनवर बोलूनच समाधान मानावे लागणार, असे दिसते.

- अंकिता मेहता.

चौकट :

लागली लेकीची ओढ...

१. लेकीचे बाळंतपण झाले आणि ती सासरी गेली. त्यानंतर अवघ्या दीड महिन्यातच कोरोनाचे संकट आले. मग वाटले बाळ बसायला लागेल, तेव्हा तिची चक्कर होईल, मग वाटले बाळ बोलू लागेल तेव्हा त्याला पाहता येईल. आता माझा नातू चालायला नाही, तर पळायला लागला आहे, तरीही या कोरोनामुळे त्याला प्रत्यक्ष पाहता येईना. या उन्हाळ्यातही लेक येऊ शकत नाही. त्यामुळे व्हिडिओ कॉल करूनच लेकीला आणि नातवंडांना पाहतो आहे.

- कला भन्साळी.

२. मुलीने नातवंडांसकट राहायला यावे, उन्हाळ्यात त्यांच्यासोबत आईस्क्रीम, आंबे खाण्याचा आनंद लुटावा, लेक-जावयाला गोडधोड जेवण करून खाऊ घालावे, चार दिवस तिच्यासोबत राहून तिची ख्यालीखुशाली विचारावी, असे खूप वाटते; पण कोरोनाने नाईलाज झाला आहे. आता असे वाटते की, तिने धावतपळत येण्यापेक्षा ती आणि तिच्या घरचे सगळे घरी आनंदात आणि सुरक्षित आहे, हेच आजच्या काळातले मोठे सुख आहे.

- रश्मी पारेख

चौकट :

आम्हाला आजोळी कधी जाता येणार

१. आजीच्या घरी उन्हाळ्यात खूप धमाल येते. माझ्या सगळ्या मावशापण उन्हाळ्यात आजीकडे राहायला येतात. चार मावशा आणि आम्ही ८ भावंडे एकत्र आलो की खूप मजा करतो. दिवसभर खेळतो. कूलरच्या थंड हवेत दाटीवाटीने बसतो. खिडकीत, गॅलरीत बसून आंबे खातो अणि रोज रात्री आईस्क्रीम पार्टी करतो. हे सगळे मी मागच्या वर्षी आणि यावर्षीही खूप खूप मिस करते आहे.

- रिधीमा बिनीवाले

२. उन्हाळ्याच्या सुट्यात आम्हाला मामाच्या, आजी- आजोबांच्या गावाला जायला खूप धमाल येते. माझे आजी- आजोबा मुंबईला राहतात. उन्हाळ्यात आणि दिवाळीत सुटी लागली की मला त्यांच्याकडे जावे वाटते. कारण तिथे माझी इतर भावंडे भेटतात, मित्र भेटतात आणि आजी-आजोबा, मावशी आमचे खूप लाड करतात; पण कोरोना आला आणि आमचे गावी जाणे थांबले.

- धैर्य मेहता

--

Web Title: My mother-in-law is happy for Leki's Mahera ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.