मृत्यूदर कमी करणे, रुग्णसेवेसाठी व्यवस्थापन, संसर्ग प्रसार थांबविणे, या त्रिसूत्रीवर लक्ष : उदय चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 01:59 PM2020-07-17T13:59:40+5:302020-07-17T14:13:20+5:30

जिल्हाधिकारी उदय चौधरी : ‘टॉप टू बॉटम’ यंत्रणांसमोर रोज नवीन आव्हाने

Focusing on the triad of reducing mortality, managing patient care, stopping the spread of infection: Uday Chaudhary | मृत्यूदर कमी करणे, रुग्णसेवेसाठी व्यवस्थापन, संसर्ग प्रसार थांबविणे, या त्रिसूत्रीवर लक्ष : उदय चौधरी

मृत्यूदर कमी करणे, रुग्णसेवेसाठी व्यवस्थापन, संसर्ग प्रसार थांबविणे, या त्रिसूत्रीवर लक्ष : उदय चौधरी

googlenewsNext

- विकास राऊत

औरंगाबाद : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी मृत्यूदर कमी करणे, रुग्णसेवेसाठी व्यवस्थापन आणि संसर्ग प्रसार थांबविणे या त्रिसूत्रीवरच लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती  जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी ‘लोकमत’ला  दिलेल्या  विशेष मुलाखतीत दिली. 

कोरोनाचा शहरात आणि ग्रामीण भागात वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या औरंगाबाद शहर आणि औद्योगिक परिसरात लॉकडाऊन आहे. या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकाऱ्यांनी या मुलाखतीत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि कोरोनासंबंधीची सद्य:स्थिती यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. सुरुवातीच्या काळात  शहरातील संमिश्र लोकसंख्या असलेल्या वसाहतींतून प्रशासनाला सहकार्य मिळाले नाही. त्याचाच मोठा फटका कोरोना व्हायरसबाबत जनजागृती आणि आरोग्य तपासणी करताना बसला. आता नागरिकांचे खूप चांगले सहकार्य मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात असे सहकार्य मिळाले असते तर चांगले परिणाम दिसले असते.  कोरोनाच्या नावाखाली चुकीचे उपचार होत असल्याच्या अफवा पसरल्या. मरकजमधून आलेल्या नागरिकांबाबत समज-गैरसमज पसरत गेले. याशिवाय २० हजार स्थलांतरित मजुरांना पाठविण्यासह सगळ्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून प्रशासनाला काम करावे लागले. कोरोना हा व्हायरस सर्वांसाठी नवीन असल्यामुळे ‘टॉप टू बॉटम’ सर्व यंत्रणा रोज नवीन आव्हाने पेलत आहेत. या महामारीत कितीही चांगले काम केले तरी कुणीही आपली स्वत:ची पाठ थोपटून घेऊ शकत नाही.  

वाढता वाढला रुग्णांचा आकडा
हा व्हायरल आजार असून सर्वांसाठी नवीन आहे. १३ मार्च रोजी पहिला रुग्ण समोर आला. २७ मार्चपर्यंत दुसरा रुग्ण समोर आला. त्यानंतर २७ एप्रिलपर्यंत रोज ५ रुग्ण येण्याचे प्रमाण होते. त्यानंतर २४ ते २६ रुग्ण एकाच दिवशी समोर आले. त्यानंतर महिनाभर अशाच आकड्यांनी रुग्ण येत राहिले. महिन्यानंतर रुग्णवाढीचा दुसरा टप्पा सुरू झाला, ४० ते ५० संख्या होऊ लागली. हळूहळू रुग्णसंख्या वाढत गेली आणि १०० रुग्णांचा आकडा औरंगाबादकरांनी पाहिला. एकूण रुग्ण आकड्यांत नवीन रुग्णांबाबत १३ मार्चचा विचार महत्त्वाचा आहे. २७ रोजी ५० रुग्ण आले. ७ मे रोजी ९९ रुग्ण समोर आले. ६ जून १०४ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर १०० च्या पुढेच रुग्णसंख्या येऊ लागली. २४ जूनला पूर्ण जिल्ह्यात २०० रुग्णांचा आकडा ओलांडला. त्यानंतरची परिस्थिती सर्वांसमोर आहे. 

वाढत्या मृत्यूदराबाबत काय मत आहे?
कोरोनाचा मृत्यूदर पाहिला तर सुरुवातीला पहिल्या १००० रुग्णांत ३२ मृत्यू होते. २ हजार रुग्णांमागे १०४ मृत्यू होते. १८ ते ७ जूनचा हा काळ आहे. याकाळातच गडबड झाली. कोरोनाचा प्रसार आणि मृत्यूदर याच काळात वाढला आहे. यामागे नेमकी कारणे शोधले आहेत. मनपा हद्दीमध्ये रुग्ण वाढू लागल्यामुळे प्रयत्नांचा वेग दुप्पट झाला. लॉकडाऊनच्या तिसऱ्या सत्रामध्ये अनेकांनी गैरफायदा घेतला. भाजीमार्केटमध्ये त्यातूनच गर्दी वाढली. २ ते ३ हजार रुग्ण होते तेव्हा १६८ मृत्यू झाले. ४ हजार रुग्ण होते तेव्हा २१८ मृत्यू झाले होते. रोज ८ ते १४ दरम्यान मृत्यू जूनमध्ये झाले. गेल्या आठवड्यात मृत्यूदर ५.८ टक्क्यांपर्यंत गेला होता, आता ४ टक्क्यांवर आला आहे. वाळूज-बजाजनगर परिसरात १४०० रुग्ण आहेत. त्या भागात ०.७ टक्के मृत्यूदर आहे. 

खाजगी हॉस्पिटल्सवर ऑडिटर नेमले 
घाटीमध्ये चांगले उपचार होत असले तरी खाजगी रुग्णालयांकडे जाण्याचा कल मोठा आहे.  घाटीत सुविधा नाहीत आणि खाजगी हॉस्पिटल अ‍ॅडमिट करून घेत नाहीत, असा चुकीचा संदेश लोकांमध्ये गेला. २० खाजगी हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्ण अ‍ॅडमिट करून घेत आहेत. ३१ आॅगस्टपर्यंत महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचे निश्चित केले. खाजगी हॉस्पिटल्सवर आॅडिटर नेमले. हॉस्पिटल्सकडून जास्तीचे बिल आकारल्यास तक्रारींसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची समिती नेमली. 

प्रसार रोखण्यासाठी काय उपाय?
जनजागृतीसह सम-विषम, संचारबंदी, लॉकडाऊनचे उपाय केले. रुग्ण शोध मोहीम राबविणे सुरूच आहे.  दरम्यान रुग्ण वाढले आणि ठेवायला जागा नाही, अशी परिस्थिती व्हायला नको, म्हणून लॉकडाऊन केले आहे. संचारबंदीबाबत अनेक मतभेद होते. उद्योगांसह सर्व आवश्यक वस्तूंसाठी संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळे मुद्दे समोर आले होते. जनतेतूनच मागणी सुरू झाली होती. स्थलांतरित, अन्नधान्य, मजुरांचा मुद्दा होऊ नये, म्हणून चार दिवसांची मुदत दिली, नंतर १० जुलैपासून संचारबंदी केली. लोकांनी १८ जुलैपर्यंतची मानसिकता करून तयारी केली. आता यातून कोरोना साखळी तुटेल की नाही, हे येणारा काळ ठरवील. 

उद्योगांबाबात काय भूमिका आहे?
औद्योगिक वसाहतींत लॉकडाऊन, संचारबंदीबाबत प्रत्येकाचे मत विभिन्न होते. उद्योजक संघटनांना बोलून संचारबंदीचा निर्णय घेतला. त्यांनी सहकार्याची भूमिका दर्शविली. रुग्णसंख्येवरून उद्योग लक्ष होण्यास सुरुवात झाली होती. आता संचारबंदीमुळे बऱ्यापैकी परिस्थितीवर नियंत्रण मिळविता येत आहे. 

सध्या आपल्याकडे काय सुविधा आहेत? 
घाटी रुग्णालयातील मेडिसिन बिल्डिंग तातडीने सुविधांसह परिपूर्ण करून घेण्यात आली. २० व्हेंटिलेटर शासनाने दिले. कोविड केअर सेंटर सुरू झाले. सध्या जिल्ह्यात १० हजार रुग्ण क्षमता आहे. मेल्ट्रॉनमधील कोविड सेंटर  एक महिन्यात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पूर्ण करून घेतले. घाटीपेक्षा जास्त आॅक्सिजन बेडची सुविधा तेथे आहे. ईएसआयसीचे हॉस्पिटल अपडेट केले आहे. ‘रेकॉर्ड टाईम’मध्ये या तीन बिल्डिंग्स आरोग्यसेवेसाठी मिळाल्या. सुरुवातीला काहीही नव्हते, आज या सुविधा आपल्या शहरात आहेत. ११४ व्हेंटिलेटर आपल्याकडे आहेत. 


तिसऱ्या लॉकडाऊननंतर गडबड
पहिले लॉकडाऊन २२ मार्च रोजी सुरू झाले. २७ एप्रिलपर्यंत शहरात खूप रुग्ण नव्हते. लॉकडाऊन एक आणि लॉकडाऊन दोन कडकरीत्या पाळले गेले. दुसऱ्या लॉकडाऊनच्या अखेरीस व तिसरे लॉकडाऊन सुरू होताना थोडी गडबड झाली. २२ मार्च ते १४ एप्रिल हा परिणामकारक लॉकडाऊन होता. या काळात रुग्ण नव्हते. २७ एप्रिलनंतरच रुग्ण वाढले. येथेच कोरोनाचा प्रसार वाढला. तिसऱ्या लॉकडाऊननंतर मिशन बिगीन आल्यामुळे संसर्गाला वाव मिळाला. 


ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या का वाढते आहे?
ग्रामीणचे रुग्ण दोन दिवसांपूर्वी शहरापेक्षा जास्त होते. १३५५ गावे असून ७८४ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये ११८ गावांत प्रत्येकी एक रुग्ण आढळला. १९ गावांत १० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. ९९ गावांत प्रशासनाने नियंत्रण केले आहे. यामध्ये वाळूज परिसरातील ७ गावे आहेत. सिल्लोड, कन्नड, वैजापूर, गंगापूर वगळले तर फुलशिवरात रुग्ण होते. अजिंठा, हतनूर, शिऊरमध्ये रुग्ण वाढले. पैठणमध्ये ११ तर चितेगावमध्ये ५४ रुग्ण आहेत. १२ दिवसांपासून रुग्ण नाहीत. आता दौलताबाद नियंत्रणात आहे. ग्रामीण भाग व्यवस्थित कंटेन्ट केला आहे. गावांत बाहेरून जाणाऱ्यांनी कोरोना नेला आहे. शहरात ग्रामीणसारखे नाही, लोकसंख्या दाट असल्याने प्रसार वाढतो आहे. 

लॉकडाऊननंतर काय असेल?
काळजी घेणे हे सर्वांसाठी गरजेचे आहे. मास्क वापरणे, हात धुणे, शारीरिक, सामाजिक सुरक्षित अंतर ठेवण्याकडे सर्वांना लक्ष द्यावे लागेल. व्हायरसला थांबविण्यासाठी मास्क चेहऱ्याला असणे गरजेचे आहे; परंतु नागरिक या सूचनांचे पालन करीत नसल्याने कोरोनाचा प्रसार होत आहे. लॉकडाऊननंतर वरील घटकांकडे फोकस केला तर कोरोनापासून संरक्षण होईल. संचारबंदी संपेल तेव्हा सम-विषमचा मुद्दा नसेल. त्याबाबत अतिशय गांभीर्याने विचार सुरू आहे. मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त याबाबत विचार करतील.

Web Title: Focusing on the triad of reducing mortality, managing patient care, stopping the spread of infection: Uday Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.