'आमचे गाव कन्टेनमेंट झोन घोषित करा'; बेशिस्त ग्रामस्थांमुळे सरपंचांनी केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 08:37 PM2020-07-31T20:37:08+5:302020-07-31T20:37:32+5:30

ग्रामपंचायत प्रशासनाला गावकरी जुमानत नसल्याने महिला सरपंचांनी प्रशासनाकडे केलेल्या मागणीची काय दखल होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

'Declare our village a containment zone'; Sarpanch demanded due to unruly villagers | 'आमचे गाव कन्टेनमेंट झोन घोषित करा'; बेशिस्त ग्रामस्थांमुळे सरपंचांनी केली मागणी

'आमचे गाव कन्टेनमेंट झोन घोषित करा'; बेशिस्त ग्रामस्थांमुळे सरपंचांनी केली मागणी

googlenewsNext
ठळक मुद्दे जिल्हा प्रशासनाकडे नवगावच्या सरपंच नाहेदा पठाण यांची मागणी

पैठण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावकरी समजावून सांगूनही ऐकत नसल्याने नवगाव ( ता. पैठण ) येथील डॉक्टर असलेल्या महिला सरपंचांनी गावास कन्टेनमेंट झोन घोषित करून पोलीस बंदोबस्त द्या अशी लेखी विनंती प्रशासनाकडे केली आहे. नवगाव येथे लॉकडाऊन व फिजिकल डिस्टंसिंगचा गावकऱ्यांनी पुरता फज्जा उडवला असून ग्रामपंचायत प्रशासनाला गावकरी जुमानत नसल्याने महिला सरपंचांनी प्रशासनाकडे केलेल्या मागणीची काय दखल होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

एकिकडे दिवसेंदिवस कोरोना रूग्णाची संख्या वाढत असताना दुसरीकडे गावकरी कशाचेच पालन करत नसल्याने नवगावच्या महिला सरपंच डॉ नाहेदा पठाण यांनी गाव कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करा अशी मागणी  केली आहे. नवगाव येथे आज चार नवीन रूग्ण आढळून आले असून ८० जणांचे अहवाल अद्याप बाकी आहे. आज घडीला नवगाव येथील रूग्ण संख्या १३ एवढी झाली आहे. गावात रूग्ण आढळून आल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने विविध उपाय योजना राबवून  संसर्ग पसरू नये म्हणून ग्रामस्थांना आवाहन केले.

परंतु, गावकऱ्यांनी या कडे दुर्लक्ष केले असून कोरन्टाईन केलेल्या व्यक्ती बिनधास्त गावभर फेरफटका मारत आहेत. बाजार भरवला जात आहे, मास्क वापरण्याची तसदी कुणी घेत नाही , फिजिकल डिस्टंसिंग बाबत ग्रामस्थ बेफिकीर आहेत. या बाबत ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार जनजागृती केली गावात ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन केले मात्र फरक पडला नाही. डॉक्टर असलेल्या महिला सरपंच डॉ नाहेदा गुलदाद पठाण यांना गावात कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो हे लक्षात आल्याने या गैरवर्तनुकीस आळा घालण्यासाठी प्रशासनास विनंती केली आहे. गावास कन्टेनमेंट झोन घोषित करा व पोलीस बंदोबस्त द्या अशी लेखी मागणी डॉ नाहेदा पठाण यांनी जिल्हाधिकारी औरंगाबाद, पोलीस अधिक्षक औरंगाबाद ग्रामीण यांच्याकडे केली आहे.

Web Title: 'Declare our village a containment zone'; Sarpanch demanded due to unruly villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.