Mumbai Marathon : इथिओपियाच्या धावपटूंनी घेतली विक्रमी धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 04:09 AM2020-01-20T04:09:28+5:302020-01-20T04:09:45+5:30

थंडगार हवामानामध्ये पार पडलेल्या १७व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाही दबदबा राहिला, तो इथिओपियाच्या धावपटूंचा.

Mumbai Marathon 2019 : The Ethiopian runners have a record run | Mumbai Marathon : इथिओपियाच्या धावपटूंनी घेतली विक्रमी धाव

Mumbai Marathon : इथिओपियाच्या धावपटूंनी घेतली विक्रमी धाव

googlenewsNext

मुंबई : थंडगार हवामानामध्ये पार पडलेल्या १७व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाही दबदबा राहिला, तो इथिओपियाच्या धावपटूंचा. पुरुष गटामध्ये इथिओपियाच्या तब्बल सहा धावपटूंनी अव्वल दहामध्ये स्थान मिळविताना पहिल्या तिन्ही स्थानांवर कब्जा केला. विशेष म्हणजे, तिन्ही धावपटूंनी स्पर्धा विक्रम मोडण्याचा पराक्रम केला. महिलांमध्येही सुवर्ण आणि कांस्य पदक इथिओपियाच्या धावपटूंनी नेले, तर केनियन धावपटूने रौप्य जिंकले.

यंदाही मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य ४२ किमी अंतराच्या शर्यतीमध्ये आफ्रिकन आणि त्यातही इथिओपिया आणि केनियन धावपटूंचा दबदबा राहणार हे निश्चित होते. मात्र, कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता होती. पुरुषांमध्ये तिन्ही विजयी धावपटूंनी विक्रमी धाव घेत मुंबई मॅरेथॉनमधील जुना विक्रम मोडण्याचा पराक्रम केला. केनियाच्या गिडॉन किपकेटर याने २०१६ साली २ तास ८ मिनिटे ५ सेकंदाची वेळ देत स्पर्धा विक्रम नोंदविला होता. हा विक्रम सुवर्ण पदक विजेत्या देरारा हुरिसा याने मोडला. त्याने २ तास ८ मिनिटे ९ सेकंदाची वेळ देत, विक्रमी सुवर्ण धाव घेतली. त्याच वेळी, आयले अबशेरो आणि बिरहानू तेसहोम यांनीही २०१६ सालची विक्रमी वेळ मागे टाकली. मात्र, देराराच्या वेगापुढे अबशेरो (२:०८:०९) आणि तेसहोम (२:०८:२६) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

महिलांमध्ये इथिओपियाच्या अमाने बेरिसो हिने २:२४:५१ अशी वेळ देत, सुवर्ण पदकावर नाव कोरले. मात्र, स्पर्धा विक्रम मोडण्यात तिला थोडक्यात अपयश आले. केनियाच्या वेलेंटाईन किपकेटरने २०१३ साली २:२४:३३ अशी दिलेली वेळ मोडण्यात अमानेला काही सेकंदाने अपयश आले. केनियाच्याच रोदाह जेपकोरिर हिने २:२७:१४ अशी वेळ देत रौप्य पदकावर कब्जा केला, तर इथिओपियाच्या हावेन हैलू हिला २:२८:५६ अशा वेळेसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

३० किमीनंतर बदलले चित्र
सकाळी ७.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरुवात झालेल्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या गटात सर्व आघाडीच्या धावपटूंनी एकत्रित आघाडी राखली होती. ३० किमी अंतरापर्यंत सर्व आफ्रिकन धावपटू एकत्रित राहिल्यानंतर देराराने हळूहळू वेग वाढवत आघाडी घेतली. मात्र, तरी त्याला आयले याने कडवी टक्कर दिली, परंतु देराराने अखेरपर्यंत आपली आघाडी कायम राखली.

अमानेचे जबरदस्त पुनरागमन
महिला गटातील विजेती अमाने बेरिसो सुरुवातीला बरीच मागे राहिलेली. ३० किमी अंतरापर्यंत केनियाची रोदाह बरीच पुढे होती, तर तिच्यामागे हावेन आणि अमाने होत्या. मात्र, यानंतर अमानेने कमालीचा वेग पकडत दोघींना मागे टाकले. ४० किमीपर्यंत अमानेने रोदाहला अडीच मिनिटांनी, तर हावेनला तब्बल ४ मिनिटांनी मागे टाकले. यानंतर, अमानेने दोघींना पुढे येण्याची एकही संधी न देताना सहज बाजी मारली.
 

Web Title: Mumbai Marathon 2019 : The Ethiopian runners have a record run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.