लंडन, दि. 13 - येथे सुरू असलेल्या विश्व अॅथ्लेटिक्स स्पर्धेच्या 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत ग्रेट ब्रिटनने सुवर्ण पदक पटकावले. या शर्यतीत जमैका संघाचा पराभव झाला. जमैका संघाचा स्टार उसैन बोल्टने आपल्या संघाला यश मिळवून ट्रॅकचा अखेरचा निरोप घेण्याचा निर्धार केला होता. मात्र, शर्यतीत धावताना त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला धावता आले नाही. 4 बाय 400 मीटरच्या शर्यतीत ब्रिटन संघातील चिजंडू उजाह, अॅडम जेमिली, डॅनियल टेल्बॉट आणि नथेनेल मिशेल-ब्लेक यांनी 37.47 सेकंद वेळ नोंदवित अव्वल स्थान पटकविले. तर, जस्टीन गट्लीनच्या नेवृत्वाखाली अमेरिकेने रौप्य पदक आणि जपानच्या संघाने कांस्य पदक मिळविले. दरम्यान, अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या कारकीर्दीतून निवृत्त होण्यापूर्वी सुवर्ण पटकावण्याचा निर्धार उसैन बोल्टने केला होता. मात्र, त्याला अपयश आले. गेल्या आठवड्यात येथील विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीतील पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेच्या जस्टीन गॅट्लीनने सुवर्ण पदाकावर कब्जा केला. त्यामळे उसैन बोल्टला कांस्य पदाकावर समाधान मानावे लागले. आत्तापर्यंतच्या कारकीर्दीत उसैन बोल्टला मिळालेले हे पहिले कांस्य पदक आहे, या आधीच्या प्रत्येक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्ण कमाई केली आहे. उसैन बोल्टने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये सहा सुवर्ण तर विश्व चॅम्पियनशिपमध्ये अकरा विजेतेपदांची कमाई केली आहे. 2012 च्या लंडन आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने तीन-तीन सुवर्णपदके कमावली आहेत. 9.58 सेकंदात 100 मीटर, तर 19.19 सेकंदात 200 मीटर अंतर धावून पार करण्याचा विश्वविक्रमही उसैन बोल्टने 2009 च्या बर्लिनमधील स्पर्धेत नोंदवला. याचबरोबर 2008 च्या ऑलिम्पिकमधील चार बाय 100 मीटर रिले शर्यतीत त्याचा सहकारी नेस्ता कॅन्टर हा उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे जमैकाचे हे विजेतेपद काढून घेण्यात आले होते.
रिले शर्यतीत उसैन बोल्टला अपयश, ग्रेट ब्रिटनने पटकावले सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2017 05:13 IST