बुडीत क्षेत्रात भक्तनिवास बांधण्यासाठी जि.प.चा अट्टहास

By Admin | Updated: September 26, 2015 00:04 IST2015-09-26T00:04:55+5:302015-09-26T00:04:55+5:30

नजीकच्या सावंगा विठोबा येथील कृष्णाजी महाराज देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे.

ZP's statue to build devotionalism in the field of drought | बुडीत क्षेत्रात भक्तनिवास बांधण्यासाठी जि.प.चा अट्टहास

बुडीत क्षेत्रात भक्तनिवास बांधण्यासाठी जि.प.चा अट्टहास

गावकरी संतप्त : सावंगा विठोबा येथील प्रकार
चांदूररेल्वे : नजीकच्या सावंगा विठोबा येथील कृष्णाजी महाराज देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. याठिकाणी येणाऱ्या महिला भक्तांची गैरसोय टाळावी व त्यांना राहता यावे, यासाठी तीर्थक्षेत्रात महिला भक्त निवासाकरिता जि. प. ने ६५ लाखांचा निधी मंजूर केला. परंतु भक्तनिवासाचे भूमिपूजन चक्क खोलाड नदीच्या बुडीत क्षेत्रात करून बांधकामाला सुरूवात झाली.
यावरून जिल्हा परिषद जनता व भाविक-भक्तांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी किती तत्पर व गंभीर आहेत हे दिसून येते. अगदी कृष्णाजी सागर मालखेड तलावाच्या बॅकवॉटरला लागून तयार होत असलेले महिला भक्तनिवास महिलांच्या मृत्युचा सापळा ठरणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया गावकरी व भाविक भक्तांकडून जि.प. प्रशासनाविरूद्ध उमटत आहेत.
गुढीपाडव्याला सावंगा विठोबा तीेर्थक्षेत्र स्थळी मोठी यात्रा भरते. येथे लाखोंच्या संख्येने भक्तगण येतात. संपूर्ण राज्यातून येथे भक्तांचा राबता असतो. त्यात महिलांचा सहभागही लक्षणीय असतो. तसेच वर्षभर असंख्य भाविकांचा दर्शनासाठी ओघ सतत सुरू असतो. परंतु दर्शनासाठी येणाऱ्या महिला भक्तांसाठी निवासाची सोय नसल्याने त्यांचे हाल होतात. ही बाब लक्षात घेऊन येथे महिला भक्तनिवास बांधण्याकरिता जि.प.ने ६५ लाखांचा निधी मंजूर केला. परंतु प्रत्यक्षात भक्तनिवास बांधण्यासाठी निवडलेली जागा नदीच्या काठावर आहे.
वर्षभर या भागात मालखेड तलावाचे बॅकवॉटर साचलेले असते. तसेच पावसाळ्यात पुरामुळे हा भाग पाण्याखाली असतो. असे असताना जि. प. ने महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न कुठेच लक्षात घेतलेला नाही. याकडे देवस्थानने प्रशासनाचे लक्ष वेधले असून पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा काय निकाल लागणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पर्यायी जागा उपलब्ध
सावंगा विठोबा देवस्थानापासून अगदी जवळ व ग्रा.पं. समोरील जागेवर महिला भक्तनिवास बांधण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध आहे. याठिकाणी असलेल्या खोल्या जीर्ण झाल्या आहेत. ही जागा महिलांना राहण्यासाठी अत्यंत सुरक्षित व आहे. या जागेपासून गावातील बाजारपेठ व देवस्थान अगदी जवळ आहे. त्यामुळे याठिकाणी महिला भक्तनिवास उभारल्यास अगदी सोयीचे व सुरक्षीत होणार आहे.
याशिवाय जि.प.मराठी शाळेजवळील खुली जागा सुध्दा त्यासाठी दुसरा पर्याय ठरू शकते. परंतु यासर्व बाबींकडे जि.प. प्रशासन व ग्रा.पं.ने डोळेझाक करून बुडीत क्षेत्रात जागा उपलब्ध करून दिल्यामुळे हा घोळ झाला आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी आहे.

Web Title: ZP's statue to build devotionalism in the field of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.