झेडपीत काँग्रेस, महापालिका, न.प.त भाजप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:56 IST2017-09-12T22:56:22+5:302017-09-12T22:56:22+5:30

ZPP Congress, Municipal corporation, NPP BJP | झेडपीत काँग्रेस, महापालिका, न.प.त भाजप

झेडपीत काँग्रेस, महापालिका, न.प.त भाजप

ठळक मुद्देडीपीसी निवडणूक निकाल : भाजपला १४, काँग्रेसला १२ जागा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बहुुचर्चित डीपीसी निवडणुकीच्या निकालांकडे यावेळी सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. प्रत्येकालाच निकालांची उत्सुकता होती. रविवारी मतदानानंतर मंगळवारी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यावेळी चार मतदारसंघ मिळून भाजपने स्वकर्तृत्वावर १५, तर मित्रपक्ष मिळून एकूण १७ जागा पटकावल्यात. काँग्रेसने स्वकर्तृत्वावर १२, तर मित्रपक्ष मिळून ३ एकूण १५ जागांवर विजय मिळविला. झेडपी मतदरसंघात काँग्रेसचे, तर महापालिका व नगर परिषद मतदारसंघात भाजपने मुसंडी मारली आहे.
डीपीसीच्या एकूण ३२ जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, यापैकी सहा जागा पूर्वीच अविरोध झाल्याने उर्वरित २६ जागांसाठी चारही मतदारसंघात निवडणूक घेण्यात आली होती. झेडपी मतदारसंघात काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडून आलेत तर महापालिका व नगरपरिषद मतदारसंघात भाजपने मुसंडी मारली आहे. नगरपंचायतीमध्ये काँग़्रेस सरस ठरली.
मंगळवार १२ सप्टेंबर रोजी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरूवात झाली. एकाचवेळी चारही मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरूवात झाली. साडेतीन तासांत मतमोजणीची संपूर्र्ण प्रक्रिया पार पडली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी विजयी उमेदवारांची नावे व उमेदवारांना मिळालेली मते जाहीर केलीत. झेडपी मतदारसंघातील काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमध्ये राजेंद्र पाटील, सुरेश निमकर, अनिता मेश्राम, वंदना करूले, पूजा आमले, वासंती मंगरोळे, प्रियंका दगडकर, अलका देशमुख यांचा समावेश आहे. तर याच पक्षाच्या अविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये बाळासाहेब हिंगणीकर, महेंद्रसिंग गैलवार आदींचा समावेश आहे.
भाजपचे निर्विवाद वर्चस्व
याच मतदारसंघातील भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये विजय काळमेघ, अनिल डबरासे, आशा वानरे यांचा समावेश आहे, तर भाजपचेच रवींद्र मुंदे व प्रवीण तायडे यापूर्वीच अविरोध निवडून आले होते. याशिवाय बसपच्या सुहासिनी ढेपे, लढा संघटनेच्या गौरी देशमुख आणि प्रहारच्या योगिता जयस्वाल यांनीदेखील जि.प.मतदारसंघातून बाजी मारली.
महापालिका मतदारसंघातून भाजपचे चेतन गावंडे, बाळू भुयार, रीता पडोळे, सोनाली करेसिया यांनी निवडणुकीतून विजय मिळविला, तर भाजपच्याच राधा कुरील या अविरोध निवडून आल्या. याच मतदारसंघातून काँग्रेसचे प्रशांत डवरे व शिवसेनेच्या जयश्री कुºहेकर यांनीदेखील विजय मिळविला. नगरपालिका मतदारसंघातून भाजपचे प्रताप अडसड, छाया दुर्गे, अक्षरा लहाने यांनी बाजी मारली. भाजपच्याच सुनीता मुरकुटे पूर्वीच अविरोध निवडून आल्या आहेत. नगरपंचायत मतदारसंघातून काँग्रेसचे वैभव वानखडे विजयी झाले.
अतिशय चुरशीच्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीवर वर्चस्व सिद्ध केले. मतमोजणी चार टेबलवर करण्यात आली. सर्वप्रथम जि.प. मतदारसंघाचा निकाल व त्यानंतर नगरपंचायत, महापालिका व शेवटी नगरपरिषद मतदारसंघाचा निकाल घोषित करण्यात आला. मतमोजणी प्रक्रिया ही निवडणूक निर्णय अधिकारी के. आर.परदेशी यांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, गजेंद्र बावणे, विनोद शिरभाते, इब्राहीम चौधरी, रमेश काळे, स्नेहल कनीचे, तहसीलदार मनोज लोणारकर, राम लंके, अजीत येळे, अनिरूद्ध बक्षी व महसूल कर्मचाºयांच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया पार पाडली.
सुहासिनी ढेपे यांनी राखला बसपा गड
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वसाधारण महिला मतदारसंघात बहुजन समाज पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य सुहासिनी ढेपे यांनी झेडपीतील विरोधी पक्षाच्या मदतीने बीएसपीचे खाते उघडले आहे. विशेष म्हणजे बहुजन समाज पक्षाच्या त्या एकमेव महिला सदस्या आहेत.
झेडपीत फुटली दोेन मते
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत जि.प.च्या अनुसूचित जमाती मतदारसंघात जिल्हा परिषदेत सत्ताधारी काँग्रेसकडून मित्रपक्ष शिवसेनेचे सदस्य विठ्ठल चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. त्यांना ३१ मते मिळाली. काँग्रेसकडे ३३ मते असताना चव्हाण यांना दोन मते कमी मिळाली, तर भाजपचा मित्रपक्ष युवा स्वाभिमानचे दिनेश टेकाम यांना विरोधीपक्षाकडे २६ मते असताना २८ मते मिळाली. त्यामुळे झेडपीतील काँग्रेसच्या कोणत्या दोन उमेदवारांची मते फुटली, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
भाजपचे पाच सदस्य ‘डीपीसी’वर
अमरावती : भाजपचे पाच नगरसेवक महापालिका क्षेत्रातून जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवडून गेले आहेत. १२ सप्टेंबरला झालेल्या मतमोजणीत भाजपच्या वाट्याला चार तर काँग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य जिल्हा नियोजन समितीवर निवडून गेला. भाजपच्या राधा कुरील याआधीच अविरोध निवडून आल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या २६ जागांसाठी रविवारी निवडणूक झाली. यात महापालिकेतील ६ जागांसाठी रिंगणात असलेल्या १२ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले होते. मंगळवारी मतमोजणीनंतर भाजपचे चार, तर काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी एक सदस्याला विजयी घोषित करण्यात आले. नवनियुक्त डीपीसी सदस्यांमध्ये भाजपचे चेतन गावंडे, सोनाली करेसिया, बाळू भुयार व रीता पडोळे तर शिवसेनेच्या जयश्री कुºहेकर व काँग्रेसचे प्रशांत डवरे यांचा समावेश आहे.
डीपीसीत प्रथमच भाजप वरचढ
अमरावती : जिल्ह्याच्या आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच भाजप आघाडी वरचढ ठरली आहे. आतापर्यंत काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीला मागे टाकत भाजपने वर्र्चस्व सिद्ध केले आहे. महापालिका, नगरपरिषद व काही अंशी जि.प.निवडणुकीचे निकाल यासाठी कारणीभूत ठरले आहेत. जिल्हा नियोजन समितीचे मतदान पसंतीक्रमानुसार घेतले जाते. ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. ही डोकेदुखी टाळण्यासाठी दरवेळी अविरोध निवडणूक घेण्याचा नेत्यांचा आग्रह असतो. यावेळीसुद्धा निवडणूक अविरोध करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेत काँग्रेस व भाजप नेत्यांनी १२:८ चा फॉर्म्युला निश्चित करून त्याचप्रमाणे जागा वाटून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Web Title: ZPP Congress, Municipal corporation, NPP BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.