झेडपीच्या शिलेदारांचा एसटी, दुचाकीने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 00:11 IST2016-11-03T00:11:59+5:302016-11-03T00:11:59+5:30
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आही.

झेडपीच्या शिलेदारांचा एसटी, दुचाकीने प्रवास
आचारसंहितेचा फटका : अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची वाहने जमा
अमरावती : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आही. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतींची वाहने जिल्हा परिषदेत जमा करण्यात आली आहेत. परिणामी सद्यस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धामणगांव रेल्वे तालुक्यातील बोरगांव धांदे या गावापासून जिल्हा मुख्यालयाचा प्रवास केला तर उपाध्यक्ष सतीश हाडोळे व सभापती गिरीश कराळे यांनी दुचाकीने कार्यालय गाठले.
२७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ९ नगरपालिकांसाठी निवडणूक होत आहे. यापार्श्वभूमिवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यात शासकीय वाहने कार्यालयाकडे जमा करण्याचा नियम आहे. नगरपालिकांसाठी १७ आॅक्टोबरपासून आचारसंहिता अंमलात आली. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींना वाहने जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्या अनुषंगाने १८ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, शिक्षण व बांधकाम सभापती गिरीश कराळे, महिला व बालकल्याण सभापती वृषाली विघे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अरूणा गोरले, समाज कल्याण सभापती सरिता मकेश्वर आदींनी त्यांच्या दिमतीला असलेली शासकीय वाहने जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे जमा केली आहेत. त्यामुळे मिनी मंत्रालयातील पदाधिकारी सध्या मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत आहेत. विद्यमान अध्यक्ष सतीश उईके यांच्याकडे स्वत:चे वाहन नसल्याने त्यांनी जिल्हा परिषदेतील त्यांच्या कार्यालयात येण्यासाठी चक्क एसटी बसने प्रवास केला तर उपाध्यक्ष सतीश हाडोळे व सभापती गिरीश कराळे दुचाकीवरून कार्यालयात पोहोचले. त्यामुळे बघ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. (प्रतिनिधी)