झेडपीत भविष्य निर्वाह निधीचा ताळमेळ जुळेना?
By Admin | Updated: March 16, 2016 08:29 IST2016-03-16T08:29:44+5:302016-03-16T08:29:44+5:30
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना त्यांच्या सामान्य भविष्य निर्वाह निधीचा ताळमेळ लागत नसल्याने याची कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

झेडपीत भविष्य निर्वाह निधीचा ताळमेळ जुळेना?
कर्मचाऱ्यांमध्ये धडकी : नियमित पावती देण्याची मागणी
अमरावती : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना त्यांच्या सामान्य भविष्य निर्वाह निधीचा ताळमेळ लागत नसल्याने याची कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना रितसर पावत्या देण्याची मागणी कर्मचाऱ्यामधून होत आहे.
जिल्हा परिषदेत विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दर महिन्याकाठी भविष्य निर्वाह निधीची कपात केली जाते. त्यानुसार या कर्मचाऱ्यांना याबाबत पावती सुध्दा दिली जात होती. मात्र सन २०११-१२ मधील भवष्यनिवाह निधीच्या पावत्या आता देण्यात आल्या आहेत. मात्र यामध्ये कपातीचा ताळ मेळ जुळत नसल्याने याची कर्मचाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. सन २०११-१२ मधील पावतीनंतर भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या मागील तीन ते चार वर्षापासून कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना त्याच्या कपात होणाऱ्या रक्कमेचा ताळमेळ जुळत नाही. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक वेतनासोबत भविष्य निर्वाह निधीबाबतची पावती देण्यात येते. मात्र जिल्हा परिषदेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे सात हजार कर्मचाऱ्यांना १ मार्च २०१२ पासून याबाबतच्या पावत्याच देण्यात आलेल्या नाहीत. पावत्या मिळत नसल्या तरीही अनेक कर्मचाऱ्यांना आपला व्यवहार सुरळीत असल्याचा समज झाला. मात्र काही कर्मचाऱ्यांच्या खात्यातून भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेत तफावत दिसून आली.
त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी कपात बाबतची पावती दर महिन्या काठी देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद कर्मचारी युनियने केली आहे.
भविष्य निर्वाह निधीत कपात करण्यात आलेल्या रक्कमेच्या बाबत संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना रितसर पावती देण्यात यावी व यात असलेल्या उणीवा त्वरीत दुर कराव्यात अशी आमची मागणी आहे.
- पंकज गुल्हाने,
अध्यक्ष, जि. प. कर्मचारी युनियन
कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी कपातीच्या पावत्या त्यांना नियमित देण्याबातची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना रितसर पावती दिली जाईल
- चंद्रशेखर खंडारे,
मुख्यलेखा व वित्त अधिकारी
जिल्हा परिषद