झेडपी, महापालिका निवडणूक फेब्रुवारीत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2016 01:44 IST2016-12-28T01:44:28+5:302016-12-28T01:44:28+5:30

मुंबईसह राज्यात १० महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी २०१७ च्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे संकेत आहे.

ZP, municipal elections in February? | झेडपी, महापालिका निवडणूक फेब्रुवारीत ?

झेडपी, महापालिका निवडणूक फेब्रुवारीत ?

निवडणूक आयोग : मतदान तारखेत आठ दिवसांचा फरक
अमरावती : मुंबईसह राज्यात १० महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी २०१७ च्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे संकेत आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद अशा दोन्ही निवडणुका एकाच दिवशी घेण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजप - शिवसेनेने प्रस्थापित पक्षांना हादरे देत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. येत्या वर्षात जिल्हा परिषद, महापालिकांचा सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. भाजप- सेना हे दोन्ही मित्र पक्ष जिल्हा परिषद, महापालिका निवडणूक वेगवेगळे लढणार असल्याने त्यादिशेने नेत्यांनी वाटचाल चालविल्याचे चित्र आहे. दुसरीकडे भाजपने महापालिका, जिल्हा परिषदेवर ‘कमळ’ फडकाविण्याचा मानस व्यक्त केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिका, जिल्हा परिषदा ताब्यात घेऊन भाजपचा झेंडा गाव-खेड्यात पोहचविण्याची रणनिती आखली जात आहे. राज्यात युती सत्तेत येण्यापूर्वी नगरपरिषद, नगरपालिकांवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला. यादरम्यान नागरिकांना झालेला मन:स्ताप बघता नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजप, सेनेला अपयश येईल, असा अंदाज काँग्रेस आघाडीला होता. मात्र नगरपरिषद निवडणुकांचा निकालानंतर भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष उद्यास आला आहे. प्रत्यक्षात नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ६४ ठिकाणी झेंडा फडकला आहे. काँग्रेस ३३ तर सेना २६, राष्ट्रवादी काँग्रेसला २१ नगरपरिषदांवर झेंडा फडकविता आला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचेच सर्वांधिक १०९० तर काँग्रेस ८९४, राष्ट्रवादी ७८६ तर शिवसेनेचे५९८ नगरसेवक विजयी झाले आहेत. नोटबंदीचा त्रास होत असताना मतदारांनी भाजपच्या पारड्यात वजन टाकल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे.
अशातच २४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य स्मारकाचे भूमिपूजन केले असून याचे नागरिकांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका ‘कॅश’ करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी मोर्चेबांधणीला प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

जिल्हा परिषद, महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये होईल, यात दुमत नाही. मात्र निवडणूक मतदानाच्या तारखेत सात, आठ दिवसांचा फरक राहील, असे अपेक्षित आहे. शेवटी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल.
- गजेंद्र बावने, जिल्हा निवडणूक अधिकारी, अमरावती

Web Title: ZP, municipal elections in February?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.