झेडपी विश्रामगृहात सदस्य - कर्मचाऱ्यांत जुंपली
By Admin | Updated: July 27, 2016 00:10 IST2016-07-27T00:10:44+5:302016-07-27T00:10:44+5:30
जिल्हा परिषदेच्या मालकीचे मालटेकडी जवळ विश्रामगूह आहे.

झेडपी विश्रामगृहात सदस्य - कर्मचाऱ्यांत जुंपली
तक्रार : अध्यक्षांकडे सुरक्षेची मागणी, आरक्षणाविना मुक्काम
अमरावती: जिल्हा परिषदेच्या मालकीचे मालटेकडी जवळ विश्रामगूह आहे. या ठिकाणी सोमवारी रात्री मेळघाटातील जि.प. सदस्य सदाशिव खडके यांनी विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांशी वाहन पार्किंग व खोलीच्या कारणावरून वाद केल्याची तक्रार येथील कर्मचाऱ्यांची मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.
जिल्हा परिषद सदस्य २५ जुलै रोजी रात्री विश्रामगृहात आले. काही वाहने पोर्चमध्ये उभी होती. ही वाहने हटवितांना वेळ लागल्याने सदस्यांनी अचानक कर्मचाऱ्यांना शिविगाळ सुरू केली. त्यांना खोली नसल्याने ते भडकले व कर्मचाऱ्यांशी वाद केल्याचे अध्यक्षांकडे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या सततच्या जाचाला कंटाळून यापूर्वीही कर्मचाऱ्यांनी बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.विशेष म्हणजे या विश्रामगृहात आरक्षण न करताच बरेच सदस्य येऊन राहतात. त्यामुळे आरक्षणाशिवाय कक्ष देण्यात येऊ नये. सोबतच या ठिकाणी बाहेरील लोकांचा वाढलेला हैदोस व मद्यपींचा धुमाकूळ तत्काळ थांबविण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांकडे केली आहे.
दरम्यान या संदर्भात बांधकाम विभागाशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन अध्यक्ष सतीश उईके यांनी कर्मचाऱ्यांना दिले. यावेळी भारत हांडे, विठ्ठल भांड, शेख बशारत शेख करामत, गजानन देशमुख, गणेश वानखडे, मनोहर फुले, अनिल बरसैय्या आदीची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
सीसीटीव्ही लागणार
जिल्हा परिषद विश्रामगृहात वाढलेल्या मद्यापींचा हैदोस रोखण्यासाठी या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. याशिवाय पोलीस संरक्षण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेतले जाईल. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. याची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही त्यांनी सुचविले आहे.