झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांचे कामकाज सुरू
By Admin | Updated: March 28, 2017 00:08 IST2017-03-28T00:08:58+5:302017-03-28T00:08:58+5:30
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीनंतर सोमवार २७ मार्च रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.

झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांचे कामकाज सुरू
पाणी, शिक्षण आरोग्याला प्राधान्य : विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद
अमरावती : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीनंतर सोमवार २७ मार्च रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक २१ मार्च रोजी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे नितीन गोंडाणे यांची अध्यक्षपदावर, तर सेनेचे दत्ता ढोमणे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. यानंतर जिल्हा परिषदेचे ३० वे अध्यक्ष म्हणून नितीन गोंडाणे यांनी सोमवारी सूत्रे स्वीकारली. यावेळी काँग्रेसचे नेते तथा आमदार वीरेंद्र जगताप, आमदार यशोमती ठाकूर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब भागवत, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, जयंत देशमुख, अभिजित बोके, वासंती मंगरोळे, अलका देशमुख, अनिता मेश्राम, वैशाली बोरकर, रंजना गवई, नितीन दगडकर, सुरेश निमकर, वंदना करूले, गजानन राठोड, माजी सदस्य मोहन सिंगवी, गणेश आरेकर, बंडू देशमुख, सीईओ किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश तट्टे, डेप्युटी सीईओ कैलास घोडके तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान अध्यक्ष गोंडाणे यांनी पदभार स्वीकारताच प्रशासकीय कामांची चुणूक दाखविली.
यावेळी प्रशासकीय कामांची ओझरती माहिती घेऊन उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यावर आपला भर राहील, असे अध्यक्ष गोंडाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यात शिक्षण, आरोग्य, पाणी, स्वच्छता यासह पारदर्शक कारभार आणि गतिमान प्रशासन याला आपली प्राथमिकता राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कर्मचारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध संघटनंच्या पदाधिकाऱ्यांनीही अध्यक्षांचे स्वागत केले. दरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे हे गुरुवारी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारतील. (प्रतिनिधी)