जि.प.चे सीईओ कांडलीत, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:13 IST2021-03-16T04:13:44+5:302021-03-16T04:13:44+5:30
पंचायत समितीसह देवमाळीतही आढावा, बेपत्ता डॉक्टरांचा प्रश्न अनुत्तरित अनिल कडू परतवाडा : अचलपूर तालुक्यातील कांडलीतील वाढती कोरोना रुग्ण ...

जि.प.चे सीईओ कांडलीत, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
पंचायत समितीसह देवमाळीतही आढावा, बेपत्ता डॉक्टरांचा प्रश्न अनुत्तरित
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील कांडलीतील वाढती कोरोना रुग्ण संख्या आणि हॉटस्पॉटच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे कांडलीत अॅक्शनमोडमध्ये आलेत. पंचायत समितीसह देवमाळीतही त्यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत कुठलीही हयगय नको, असे सक्त निर्देशनही त्यांनी दिलेत.
१३ मार्चला ते अचलपुरात दाखल झालेत. कांडली ग्रामपंचायतीत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेसह पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. नंतर प्रत्यक्ष कांडलीत रस्त्यावर उतरून परिस्थितीचे अवलोकन केले. होम आयसोलेटेड रुग्णांसमवेत त्यांनी संवादही साधला. गावातील अस्वच्छता आणि कोरोनाच्या अनुषंगाने करावयाच्या निर्जंतुकीकरणाकडेही त्यांनी स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले. कोरोना प्रतिबंधासाठी कोविड चाचण्या, तपासण्यांची संख्या वाढवावी. लसीकरणाचाही विस्तार व्हावा. लसीकरण वाढविण्यासाठी कॅम्प आयोजित करा. प्रत्येक दुकानदाराची कोरोना टेस्ट करण्यात यावी. कोरोना निगेटिव्हचे प्रमाणपत्र सोबत ठेवायला लावणे. ते प्रमाणपत्र नसल्यास दुकान सील करण्याचे निर्देशही अमोल येडगे यांनी दिले.
अचलपूर पंचायत समितीत त्यांनी आढावा घेतला. तेथे प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांकरिता त्यांनी कोविड चाचणी सक्तीची केली. कोविड चाचणी निगेटिव्ह असणाऱ्यांनाच पंचायत समितीत प्रवेश द्यावा. निगेटिव्ह चाचणी आल्यावरही घरी थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती लावण्याचे निर्देशही त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेत. अचलूपर उपजिल्हा रुग्णालय आणि सुतिकागृहालाही त्यांनी भेट दिली. दरम्यान देवमाळी ग्रामपंचायतीलाही त्यांनी भेट देऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. आवश्यक ते निर्देशही दिलेत. याप्रसंगी गटविकास अधिकारी जयंत बाबरे, विस्तार अधिकारी एम.एस. कासदेकर, ए.के. फुटाणे यांच्यासह पंचायत प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य पंचायत प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बॉक्स
कोरोनाच्या अनुषंगाने कांडली हॉटस्पॉट असूनही ज्यांच्याकडे रुग्ण निघाला केवळ त्या घरीच निर्जंतुकीकरण करून आजूबाजूची, मागची पुढची घरे तशीच सोडून दिली जात आहे. यात कांडलीतील निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे. अख्ख्या कांडलीत घरोघरी नियमित निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबविणे गरजेचे झाले आहे. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी आढावा बैठकीत निर्जंतुकीकरणावर भर दिला आहे.
बॉक्स
डॉक्टरचा प्रश्न कायम
कांडलीतील सीएचओ डॉक्टर कांडली उपकेंद्रातून बेपत्ता आहेत. आरोग्य विभागानेच त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठविले आहे. अमोल येडगे यांच्या या दौऱ्यात मात्र त्या बेपत्ता सीएचओ डॉक्टरांचा प्रश्न अनुत्तरित आहे.