उत्तुंग पाषाण भिंतीच्या आतही झिंग.. झिंग.. झिंगाट...
By Admin | Updated: October 29, 2016 00:14 IST2016-10-29T00:14:35+5:302016-10-29T00:14:35+5:30
तुरुंग म्हटले की गुन्हेगारांचे वेगळे विश्व. मात्र या गुन्हेगारांच्या हातानांही कला, कौशल्य, निपुणता, गुण असल्याचा प्रत्यय शुक्रवारी अनुभवता आला.

उत्तुंग पाषाण भिंतीच्या आतही झिंग.. झिंग.. झिंगाट...
अमरावती कारागृहात दिवाळी साजरी : नृत्य, लावणी, कव्वाली, गझल, नाट्यांची मैफल
अमरावती : तुरुंग म्हटले की गुन्हेगारांचे वेगळे विश्व. मात्र या गुन्हेगारांच्या हातानांही कला, कौशल्य, निपुणता, गुण असल्याचा प्रत्यय शुक्रवारी अनुभवता आला. दिवाळी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बंदीजनांनी नृत्य, लावणी, कव्वाली, गझल, नाट्याचे सादरीकरण करून उपस्थिताना काळ खिळवून ठेवले. समारोपानंतर अधिकारी, बंदीजनांनी एकत्र येऊन झिंग, झिंग, झिंगाट या गाण्यावर तुफान नृत्य करीत कारागृहात सैराटमय वातावरण निर्माण केले.
मध्यवर्ती कारागृहात संत गाडगेबाबा प्रार्थना मंदिरात शुक्रवारी दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अचलपूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश मुजीब शेख व त्यांच्या पत्नी जेहरुनिस्सा शेख, अर्थविषयक सल्लागार अर्चना पाटील, कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, स्टेट बँकेचे विलास बिंदोर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव, पांडुरंग भुसारे, भगवान सदांशिव, रेवननाथ कानडे, महिला तुरुंगाधिकारी ज्योती आठवले, मोहन चव्हाण, सांस्कृतिक विभागप्रमुख भूषण कांबळे, गोवर्धन लांडे, दादाराव लांडे, लिला सावरकर, यादव मदनकर आदी उपस्थित होते. ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था अनाथांच्या नाथा तूज नमो.. तूज नमो... या गीताने दिवाळी उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर आईचा गोंधळ, कव्वाली, गजल, गीतांची मैफल रंगत गेली. दिलीप गवई व प्रल्हाद मोरे यांनी ‘सोडून द्या अहमपणा जिजाऊ बना, सावित्री बना अन् रमाई बना’ आदी गीतांनी उपस्थित महिला, पुरुष बंद्यांच्या काळीज जिंकले. रामेश्वर उजेड यांनी ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ सादर केलेल्या लावणीने अनेकांच्या मनाचा ठाव घेतला. भारूड, गोंडी गीत, मिमेक्री, दोन पात्री नाट्य, कोंबडी पळाली नृत्य सादर करण्यात आले. दरम्यान एका बंद्याने ‘घर के चिराग ने घर को जला दिला, जिसको हसाया मैने उसने ही रुला दिला’ ही गायिलेली गजल आजचा सामाजिक भाव सांगून गेली. चार भिंतीच्या आत साजरी करण्यात आलेली दिवाळी ही हिंदू-मुस्लिमांच्या एकात्मतेचे प्रतीक ठरले. दिवाळीनिमित्त शुक्रवारी आयोजित विविध कार्यक्रमात पहिल्यांदाच महिला, पुरुष बंदीजनांना एकत्र आणण्याचा प्रयोग करण्यात आला. बंदीजनांमध्ये माणुसकी आणि समाजाप्रति चांगली भावना निर्माण व्हावी, यासाठी सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. याअनुषंगाने शुक्रवारी मध्यवर्ती कारागृहात दिवाळी उत्सव साजरा करण्यात आल्याचे मनोगत कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी व्यक्त केले. वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव यांनी दिवाळी उत्सव साजरा करण्यासाठी घेतलेला पुढाकार अतिशय मोलाचा ठरला आहे. (प्रतिनिधी)
आठ बंदीजन उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित
पाषाण भिंतीच्या आत हातून कळत-नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त करीत न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी शिक्षा भोगत आहेत. मात्र या बंदीजनांमध्ये समाजाप्रती आदर, सन्मान निर्माण व्हावा, यासाठी विविध उपक्रम राबविले जाते. त्याच अनुषंगाने आठ बंदीजनांना उत्कृष्ट बंदीजन म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात दिनकर नरोटे, रामेश्वर उजेड, सुदर्शन विघ्ने, दिलीप गवई, शंकर उईके, सादेराव कपाटे, बबन थोरात, धनराज सुरोशे यांचा समावेश आहे.