जिल्हा परिषदेचे कोविड केअर केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 05:00 IST2021-05-22T05:00:00+5:302021-05-22T05:00:40+5:30
जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद व शिक्षक, कर्मचारी संघटनाच्या मदतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये १४ कक्षात २० बेड उपलब्ध करून देण्यात आले. त्यापैकी दोन खाटांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसविण्यात आले. यापुढे आणखी १० बेडचे नियोजन याठिकाणी करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेचे कोविड केअर केंद्र सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी शासन, प्रशासन, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आदी यंत्रणा काटेकोर प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना गती देत आता जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात कोविड केअर तथा समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
कोविड केअर सेंटरचा प्रारंभ शुक्रवारी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर, आरोग्य व वित्त सभापती बाळासाहेब हिंगणीकर, महिला व बाल कल्याण सभापती पूजा आमले, समाजकल्याण सभापती दयाराम काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले आदींच्या उपस्थित करण्यात आला.
जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद व शिक्षक, कर्मचारी संघटनाच्या मदतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये १४ कक्षात २० बेड उपलब्ध करून देण्यात आले. त्यापैकी दोन खाटांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसविण्यात आले. यापुढे आणखी १० बेडचे नियोजन याठिकाणी करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून तातडीच्या वेळी कोरोना रुग्णांवर उपचार केला जाणार आहे. या केंद्रात रुग्णांच्या वैद्यकीय उपचार व देखभालीसाठी एक वैद्यकीय अधिकारी, तीन समुदाय आरोग्य अधिकारी, दोन परिचारिका कार्यरत राहणार आहेत. दीड वर्षांपासून शासन व प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. त्यांना साथ देण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन ना. ठाकूर यांनी नागरिकांना केले.
म्युकरमायकोसिस संदर्भात जनजागृती
जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यावर उपचार करण्यासाठी यंत्रणा उभारण्याबरोबरच जाणीवजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. आजाराची लक्षणे दिसल्यास घरगुती उपचार करण्यापेक्षा तत्काळ वैद्यकीय तपासणी व उपचार घ्यावा. वेळीच उपचार केला, तर यातून पूर्णपणे बरे होता येते, असेही पालकमंत्री म्हणाल्या.