अध्यक्षपदावरुन जिल्हा परिषदेत आघाडीत बिघाडी
By Admin | Updated: September 18, 2014 23:26 IST2014-09-18T23:26:58+5:302014-09-18T23:26:58+5:30
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, काँग्रेसचे बहुतांश सदस्य तसेच नेते राष्ट्रवादीसोबत

अध्यक्षपदावरुन जिल्हा परिषदेत आघाडीत बिघाडी
अमरावती : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, काँग्रेसचे बहुतांश सदस्य तसेच नेते राष्ट्रवादीसोबत जाण्यास इच्छुक नसल्याने राष्ट्रवादी आणि कॉग्रेस यांच्यातील संभाव्य आघाडी होण्यापूर्वीच बिघाडीची चर्चा जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. अमरावती जिल्हा परिषदेमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व अन्य मित्रपक्षांनी एकत्र येऊन सत्ता मिळविली आहे. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादीने अडीच वर्षे सत्ता उपभोगली आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाले आहेत.
तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, काँग्रेसच्या सदस्यांना आणि नेत्यांनाही राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यात स्वारस्य नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत तुर्तास काँग्रेसची जिल्हा परिषद सदस्यांसोबत चर्चा झालेली नाही. याशिवाय काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबतही याबाबत चर्चा झाल्याची माहिती नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सध्या तरी काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही, असे दिसते. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता असून यात काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.