जिल्हा परिषदेचे कोरोना मिशन लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:14 IST2021-04-08T04:14:10+5:302021-04-08T04:14:10+5:30
अमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने लसीकरण मिशन हाती घेतले आहे. प्रत्येक केंद्रावर दररोज १०० जणांना लस ...

जिल्हा परिषदेचे कोरोना मिशन लसीकरण
अमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने लसीकरण मिशन हाती घेतले आहे. प्रत्येक केंद्रावर दररोज १०० जणांना लस देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार काेरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता यावर नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सोबतच ग्रामीण भागात प्रत्येक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आदी ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने मिशन लसीकरणावरही भर दिला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.
शासनाने ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तिंना लसीकरणाचा लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने याचे सूक्ष्म नियोजन केले आहे. त्यासाठी मिशन लसीकरण मोहीम सुरू केली आहे. यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा सर्व स्तरावरील कर्मचारी लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी प्रत्येक गावात नियोजन करून नागरिकांमध्ये प्रबोधनाव्दारे जनजागृती केली जात आहे. याशिवाय ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्राम दक्षता समिती, अंगणवाडी सेविका, आशा सेविकांच्या माध्यमातून लसीकरणासाठी पात्र असलेल्या व्यक्तिंना लस घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पोस्टर्स, बॅनर लावून नागरिकांना खबरदारीसाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली जात आहे. नियमित मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्स हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन सीईओ अविश्यांत पंडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले आदींनी केले आहे.
बॉक्स
आम्ही लस घेतली तुम्हीपण घ्या
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून शासनाकडून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरणाची सुविधा झेडपी प्रशासनाने ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आदी ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. ज्या नागरिकांनी लस घेतलेली नाही अशांनी लस घ्यावी तसेच ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशांनी दुसरा डोस दिलेल्या मुदतीत घ्यावा, असे आवाहनही झेडपी आरोग्य विभागाने केले आहे.