जि.प.अधिकारी बैठकांनमध्येच व्यस्त
By Admin | Updated: September 18, 2015 00:20 IST2015-09-18T00:20:27+5:302015-09-18T00:20:27+5:30
जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत एकीकडे प्रभारी अधिकाऱ्यांचे ग्रहण कायम असतानाच दुसरीकडे दररोज होणाऱ्या बैठका ...

जि.प.अधिकारी बैठकांनमध्येच व्यस्त
परिणाम : फायलींचा वेग मंदावला
अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत एकीकडे प्रभारी अधिकाऱ्यांचे ग्रहण कायम असतानाच दुसरीकडे दररोज होणाऱ्या बैठका आणि व्हीसीमुळे कामकाज पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेळ द्यावा लागत आहे. त्यामुळे प्रशासकीय कामावर ताण पडत असून विविध कामांच्या फायलींचा वेग मंदावला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील हे म्हसुरी येथे ४५ दिवसांच्या प्रशिक्षणावर गेले होते. त्यांचा ६ सप्टेंबर रोजी प्रशिक्षणाचा कालावधी संपला आहे. त्यानंतर ते २० सप्टेंबरपर्यंत रजेवर असल्याने त्याचा कार्यभार विभागीय आयुक्त कार्यायातील आस्थापना विभागाचे उपायुक्त सुनील लांडगे यांच्याकडे अतिरिक्त सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना मुख्य जबाबदारीसह जिल्हा परिषदेचे कामकाज सांभाळावे लागत आहे. अशातच वरिष्ठ पातळीवरून दररोज घेण्यात येणाऱ्या बैठका आणि विविध विषयांवर होणाऱ्या व्ही.सी.मुळे अन्य कामांचा ताण वाढत आहे. याच कामकाजात व दौऱ्यात अधिक वेळ जातो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या कामकाजासंबंधित महत्त्वाच्या फायली लांबणीवर पडत आहेत. याला सर्वाधिक वेळ द्यावा लागत असल्याने जिल्हा परिषदेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना आता प्रशासकीय कामकाज पूर्ण करण्यासाठी वेळ अपुरा पडत आहे. यापार्श्र्वभूमिवर शासन व प्रशासनस्तरावर होणाऱ्या विविध बैठकांचा वाढलेला ओघ मर्यादेत आणणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी नियोजन होणे गरजेचे असल्याचे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पेंडिंग फाईल्सचा ओघ वाढणार नाही. (प्रतिनिधी)