जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण ‘एससी’साठी राखीव
By Admin | Updated: June 11, 2016 00:09 IST2016-06-11T00:09:36+5:302016-06-11T00:09:36+5:30
आगामी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रार्र्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीची सोडत ...

जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण ‘एससी’साठी राखीव
आरक्षण सोडत : राजकीय समीकरणे बदलणार
अमरावती : आगामी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रार्र्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीची सोडत शुक्रवार १० जून रोजी मंत्रालयातील सह्याद्री अतिथीगृहात राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यात अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तब्बल २० वर्षांनंतर अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी राखीव निघाल्याने राजकीय पक्षांची आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
येत्या मार्च महिन्यात म्हणजेच सन २०१७ मध्ये विदर्भातील सात आणि उर्वरित राज्यातील २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुका एकाचवेळी होत असल्याने मिनीमंत्रालयाच्या या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परिणामी निवडणुकीच्या दृष्टीने आगामी अध्यक्षपदाचे आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार दहा जून रोजी ही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. त्यामुळे नव्या आरक्षणावरच राजकीय घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
यानुसारच राजकीय व्यूहरचना आखली जाणार आहे. अमरावती जिल्हा परिषदेला स्थापनेपासून आतापर्यंत २९ अध्यक्ष लाभले आहेत. आता सन २०१७ मध्ये ३० व्या अध्यक्षपदासाठी ही सोडत काढली जाणार आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेत ओबीसी महिला, ओपन महिला, पुरूष, ओपन, ओबीसी, महिला याप्रमाणे अध्यक्ष पदाचे आरक्षण होते. मात्र मागील काही वर्षांतील अध्यक्षपदाचा कार्यकाळ लक्षात घेता २० वर्षांतील कालखंडानंतर अनुुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी आतापासूनच अनेकांनी बाशिंग बांधले आहेत. यात आगामी अध्यक्षपदाची लॉटरी कुणाला लागेल याकडे लक्ष लागले आहे.
राजकीय समीकरणे नांदी
शुक्रवारी मुंबईतील अतिथीगृहात राज्यातील २६ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सोडत काढली आली गेली. यात अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुुसबचित जातीसाठी राखीव निघाल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे राजकीय समीकरणे जुळविण्याचे वारे राजकीय क्षेत्रात वाहू लागले आहेत. यात आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, बसपा, रिपाइं व अन्य पक्षांच्या उमेदवारीसाठी फिल्डींग लावणे सुरू झाले आहे.