जिल्हा परिषद अधिकारी- शिक्षकांची सिंगापूर वारी
By Admin | Updated: November 5, 2016 00:16 IST2016-11-05T00:16:04+5:302016-11-05T00:16:04+5:30
शिक्षक आणि अधिकाऱ्यांना शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय अनुभव यावा या उद्देशाने येत्या काळात सिंगापूर वारीचे आयोजन शिक्षण विभाग करणार आहे.

जिल्हा परिषद अधिकारी- शिक्षकांची सिंगापूर वारी
आॅनलॉईन नोंदणी सुरू : स्वखर्चाने करावा आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा
जितेंद्र दखणे अमरावती
शिक्षक आणि अधिकाऱ्यांना शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय अनुभव यावा या उद्देशाने येत्या काळात सिंगापूर वारीचे आयोजन शिक्षण विभाग करणार आहे. पूर्णपणे स्वखर्चाने होणाऱ्या या दौऱ्यासाठी जिल्ह्यातील ५ आणि राज्यातील आधारपत्रे चारशेहून अधिक अधिकारी आणि शिक्षकांनी नोंदणी केलेली आहे.
अमरावती जिल्ह्यात ५ शिक्षक यासाठी उत्सूक दिसले. लवकरच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वऱ्हाड सिंगापूरला निघणार आहे. सिंगापूरला नाट्याचा प्रयोग सर्वत्र रंगणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक प्रयोग केले जात आहे. नवनवे प्रयोग करणारे शिक्षक आणि अधिकारी यांना प्रोत्साहनदेखील दिले जात आहे. त्या शाळांमध्ये उत्कृष्ट प्रयोग होतात. ते शिक्षकांनी बघावे यासाठी शिक्षकांचे दौरे राज्यात नियमितपणे आयोजित केले जात आहेत.
सोबतच शिकणाच्या वारीचा उपक्रम शिक्षण विभाग मागील वर्षीपासून राबवीत आहे आणि यावर्षीही हा उपक्रम राबविला जाणार आहे. या सर्व उपक्रमांना आता परदेश दौऱ्याचीही जोड लाभली आहे. दर्जेदार शिक्षणाच्या बाबतीत जागतिक स्तरावर सध्या सिंगापूर अग्रस्थानावर आहे. यापूर्वी फिनलँड सर्वोच्च स्थानावर होते. मात्र आता त्याची जागा सिंगापूरने घेतली आहे. तेथे होणारे शैक्षणिक प्रयोग शिक्षक आणि अधिकाऱ्यांना बघता यावेत, यासाठी हा दौरा होणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र, या दौऱ्यासाठीचा कोणताही खर्च शिक्षण विभाग करणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. इच्छुकांना हा खर्च स्वत: करावा लागणार आहे, हे विशेष.
काय -काय बघायचं सिंगापूरला ?
सिंगापूर दौऱ्यात येथील शाळांना भेटी दिल्या जाणार आहेत. शिवाय तेथे होणारे शैक्षणिक प्रयोग बघणे, शिक्षण पद्धतीचा अभ्यास करणे, शिक्षण पद्धत आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करणे, अशा विविध संधी शिक्षक व अधिकाऱ्यांना मिळतील.
कोणाला घेता येईल सहभाग ?
सिंगापूर दौऱ्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही विभागांतील शिक्षक आणि अधिकारी तसेच पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदींना दौऱ्यात सहभागी होता येणार आहे.
जिल्ह्यात केवळ पाच जणांची नोंदणी
हा दौरा स्वखर्चाने असून जिल्ह्यातील पाच जणांनी केवळ या दौऱ्यासाठी रस दाखविला आहे. दौऱ्याच्या नोंदणीसाठी आॅनलाइन लिंक देण्यात आली आहे. त्या आधारे नोंदणी करण्यात येत आहे. येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत ही नोंदणी स्वीकारली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सिंगापूर येथील शैक्षणिक प्रयोग राज्यात राबविता येतील. याची चाचपणी व शिक्षक व अधिकाऱ्यांना याचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, यासाठी हा दौरा आहे. सध्या पाच जणांची नोंदणी दौऱ्यासाठी झाली. यात इच्छुक सहभाग होवू शकतात. मात्र, सर्व खर्च स्वत: करावा लागणार आहे. नेमका हा दौरा केव्हा आहे हे मात्र अद्याप ठरले नाही.
- एम.एम. पानझाडे
शिक्षणाधिकारी, प्राथमिक