जिल्हा परिषद कनिष्ठ सहायक, रोखपालाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
By Admin | Updated: February 17, 2015 00:53 IST2015-02-17T00:53:46+5:302015-02-17T00:53:46+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेच्या निलंबित कनिष्ठ सहायक, रोखपालाने सेवा कालावधीत

जिल्हा परिषद कनिष्ठ सहायक, रोखपालाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
अमरावती : जिल्हा परिषदेच्या निलंबित कनिष्ठ सहायक, रोखपालाने सेवा कालावधीत २८ लाख १४ हजार ९४६ रूपयांचा अपहार केला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी संजय गोपाळ गिरी याच्याविरुद्ध अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद यांनी चौकशी व अंकेक्षण अहवालाचा आधार घेत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
सन २०१४ मध्ये काही दिवस गिरी यांच्याकडे कनिष्ठ सहायक व रोखपालपदाची जबाबदारी प्रशासनाने दिली होती. आर्थिक नोंदीचे ५९७०१ ते ५९८०० अशा शंभर पावत्यांचे संपूर्ण पुस्तक गहाळ केले. आर्थिक व्यवहार हाताळताना प्राप्त धनादेशाची नोंदही घेतली गेली नाही. रोकडवहीत जमा-खर्चाच्या रकमा निर्धारित वेळेत जमा केलेल्या नाहीत. ज्या एलआयसी आणि पीपीएफच्या रक्कमा कर्मचारी व अधिकाऱ्याच्या वेतनातून दरमहा कपात केल्या गेल्या त्याचा पैसाही त्यांनी वापरला त्यामुळे हा पैसा शासकीय तिजोरीत भरण्यास विलंब झाला. ही बाब अंतर्गत चौकशीतून उघडकीस आली. कंत्राटी ग्रामसेवकाकडून आलेल्या सुरक्षा ठेवीची नोंदवहीच गहाळ आहे. याशिवाय २६ नोव्हेंबर २०१२ ते २० डिसेंबर २०१५ या दरम्यान विविध विभाग व पंचायत समिती कार्यालयाचे पुरवठा आदेशही संबंधित कनिष्ठ सहायकाने गहाळ केले आहेत. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने एक चौकशी समिती नेमली मात्र आवश्यक दस्तऐवज गिरी यांनी समितीसमोर सादर केले नाही त्यामुळे गहाळ दस्ताऐवज व पावती पुस्तकातील नमूद आर्थिक घोळ २८ लाखावर आहे. (प्रतिनिधी)