दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांना झेडपी देणार समज

By Admin | Updated: August 27, 2016 00:02 IST2016-08-26T23:55:48+5:302016-08-27T00:02:33+5:30

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत विषय समितीच्या महत्त्वाच्या सभेची नोटीस दिल्यावरही विभागाचे अधिकारी नेहमी गैरहजर राहतात. ...

ZDP-backed officials of Dandi Bahadar | दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांना झेडपी देणार समज

दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांना झेडपी देणार समज

सदस्य आक्रमक : जलव्यवस्थापन, स्थायी समितीचा निर्णय 
अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत विषय समितीच्या महत्त्वाच्या सभेची नोटीस दिल्यावरही विभागाचे अधिकारी नेहमी गैरहजर राहतात. हा प्रकार नित्याचाच झाल्याने शुक्रवारी जलव्यवस्थापन समिती सभेत व त्यानंतर स्थायी समितीच्या सभेत या मुद्यावर सदस्यांनी आक्षेप घेऊन अशा अधिकाऱ्यांना ताकिदपत्र देण्याची मागणी सभागृहात रेटून धरली. अखेर सभेचे सचिव डेप्युटी सीईओंनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल, असे आश्वासन सदस्यांना दिलेत.
२६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात जलव्यवस्थापन समितीची सभा विविध विषयाला अनुसरून अध्यक्ष तथा सभापती सतीश उईके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सभेत माजी अध्यक्ष तथा सदस्य सुरेखा ठाकरे यांनी जलव्यवस्थापन, स्थायी समिती, आणि सर्वसाधारण सभा महत्त्वाच्या आहेत. मात्र बरेच वेळा या सभेला झेडपीतील काही अधिकारी शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी पत्र पाठवूनही सभेला हजर राहत नाहीत. ही बाब गंभीर आहे. दरम्यान सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता. प्रशासनामार्फत उपस्थित व गैरहजर अधिकाऱ्यांची माहिती घेतली. यावेळी वरिष्ठ भूजल सर्वेक्षण विभाग, राज्य परिवहन, कार्यकारी अभियंता पाटबंधारे लघुसिंचन विभाग, वनविभाग, कार्यकारी अभियंता उर्ध्ववर्धा आदी विभागाचे अधिकारी गैरहजर आढळून आलेत. याशिवाय स्थायी समितीतही गैरहजर अधिकाऱ्यांचा मुद्दा अभिजित ढेपे, रवींद्र मुंदे, बबलू देशमुख, सुधीर सूर्यवंशी यांनी उपस्थित केला. त्यामुळे दोन्ही समितीच्या सदस्यांच्या मागणीची दखल घेत सभेला गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना झेडपीच्यावतीने पत्राव्दारे समज देण्यात येईल, असे सीईओ किरण कुलकर्णी यांनी सभागृहात सांगितले. दरम्यान जलव्यवस्थापन समितीत मेळघाटील पाणीपुरवठा योजना केवळ वीज जोडणीअभावी बंद पडल्याचा मुद्दा सदस्य सदाशिव खडके यांनी उपस्थित केला. त्यानुसार धारणीचे उपअभियंता यांनी वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केल्यानंतरही वीज जोडणीअभावी मागील दोन ते तीन वर्षांपासून पाणीपुरवठा योजना सुरू होऊ शकला नसल्याचे वास्तव सभागृहात मांडले. दरम्यान वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता एन. बी. गावंडे यांनी याबाबत तातडीने कारवाई केली जात असल्याचे सांगितले.
यावेळी सभेला अध्यक्ष सतीश उईके, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरू णा गोरले, सरिता मकेश्र्वर, सदस्य सुरेखा ठाकरे, महेंद्रसिंग गैलवार, बापुराव गायकवाड, सदाशिव खडके,ज्योती आरेकर, करूणा गावंडे सीईओ किरण कुलकर्णी, ङेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, जे.एन आभाळे, संजय इंगळे, सिंचनचे कार्यकारी अभियंता प्रमोद तलवारे, पाणी पुरवठयाचे के.टी. उमाळकर, कृ षी विभागाचे अधिक्षक अधिकारी दत्तात्रय मुळे आनंद दासवत, प्रदिप ढेरे, संजय येवले व अन्य अधिकारी उपस्थित होते.
खडीमल तलाव दुरूस्तीचा ठराव
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात खडीमल या गावातील सिंचन तलाव नादुरूस्त असल्याने यात जलसंचय होत नाही. त्यामुळे या तलावाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. त्याशिवाय या गावातील पाणी टंचाईची समस्या दुर होऊ शकत नाही असा मुद्दा सदस्य महेंद्रसिंग गैलवार यांनी मांडला. हा ठराव एकमताने मान्य केला आहे.

(प्रतिनिधी)


पीक विम्याचा मुद्दा गाजला
कृषी विभागाचे वतीने काढण्यात आलेल्या पीक विम्यात सोयाबीन पिकांचे चांदूरबाजार तालुक्यात अधिक नुकसान झाले. जिल्ह्यातील इतर तालुक्यात उंबरठा पद्धतीने लावलेले निकष व सर्वेक्षणात या तालुक्याचे नुकसान कमी कसे येऊ शकते, असा प्रश्न सभेत सुरेखा ठाकरे यांनी उपस्थित केला. दरम्यान या मुद्दावर कृषी अधीक्षक अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी पीक विमा कंपनीकडे पत्रव्यवहार व प्रत्यक्ष संवादही साधला. मात्र यावर कुठलेही उत्तर अद्याप प्राप्त झाले नाही. यासंदर्भात तातडीने योग्य कारवाई करण्यात येईल व त्याबाबत सदस्यांना माहिती देण्याचे मुळे यांनी मान्य केले.

Web Title: ZDP-backed officials of Dandi Bahadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.