तरुणांचा चिखलदरा ठाण्यावर आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:52+5:302021-07-07T04:15:52+5:30
फोटो पी ०६ चिखलदरा चिखलदरा : मित्रांसह फिरायला आलेल्या रिद्धपूर येथील अंकित गजभिये या युवकाचा आडनदीनजीक कलालकुंड डोहामध्ये मृतदेह ...

तरुणांचा चिखलदरा ठाण्यावर आक्रोश मोर्चा
फोटो पी ०६ चिखलदरा
चिखलदरा : मित्रांसह फिरायला आलेल्या रिद्धपूर येथील अंकित गजभिये या युवकाचा आडनदीनजीक कलालकुंड डोहामध्ये मृतदेह आढळला होता. याप्रकरणी सहकारी युवकांविरुद्ध ॲट्रॉसिटी व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मंगळवारी दुपारी ३ वाजता पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा नेऊन तक्रार देण्यात आली.
अंकुश किशोर गजभिये (१८, रा. रिद्धपूर) हा ३ जून रोजी आपल्या पाच मित्रांसह कलालकुंड परिसरात फिरायला आला होता. सर्व मित्र घरी परत आले. मात्र, अंकुश घरी परतला नाही. यासंदर्भात वडील किशोर गजभिये यांनी ४ जून रोजी मित्रांना विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर शिरखेड पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली. काही सहकाऱ्यांनी चिखलदरा परिसरात शोधमोहीम घेतली असता, अज्ञात युवकाचा मृतदेह सापडल्याची माहिती त्यांना ७ जून रोजी पोलिसांकडून मिळाली. वडील व सहकाऱ्यांनी तो मृतदेह अंकुशचा असल्याचे सांगितले.
दिशाभूल करणाऱ्या अंकुशच्या मित्रांविरुद्ध तक्रार देऊन एक महिना उलटूनसुद्धा कुठलाच गुन्हा दाखल न झाल्याने मंगळवारी पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात किशोर गजभिये, वंचित बहुजन आघाडीचे सागर भवते, अंकुश वाकपांजर, विद्या वानखडे, विलास दामले, विजय गव्हांदे, प्रशांत गवई, विश्वास वानखडे, अमित नाईक, अर्जुन तायडे, किशोर तायडे, सदानंद वानखडे, मदन गायकवाड, कृषी डोंगरे, मयूर जोग, अतुल वानखडे, सिद्धार्थ तायडे, कुणाल नेतनराव, प्रशिक मोहोड, अमर गवई आदी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोट
अंकुशसोबत असलेल्या मित्रांनी प्रचंड दिशाभूल केली. घातपात करून मुलाला जिवानिशी मारण्यात आले. त्यासंदर्भात पोलिसांत तक्रार होती. एक महिना देऊनसुद्धा गुन्हा दाखल न झाल्याने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
- किशोर गजभिये, रिद्धपूर, ता. मोर्शी
कोट
मृतदेहाचा अंतिम शवविच्छेदन अहवाल आल्यावर वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल. संबंधिताची तक्रार प्राप्त झाली आहे.
- राहुल वाढिवे, ठाणेदार, चिखलदरा
060721\img-20210706-wa0078.jpg
फोटो वंचित आघाडी चा चिखलदारा ठाण्यावर आक्रोश मोर्चा