युवा स्वाभिमानचे म्याऊ आंदोलन पोलिसांनी लावले उधळून
By Admin | Updated: April 26, 2016 00:11 IST2016-04-26T00:11:25+5:302016-04-26T00:11:25+5:30
जिल्हा परिषदेत वाढत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात युवा स्वाभिमान संघटनेने सोमवारी जिल्हा परिषद

युवा स्वाभिमानचे म्याऊ आंदोलन पोलिसांनी लावले उधळून
कार्यकर्ते आक्रमक : पदाधिकाऱ्यांसह महिलांनाही अटक, पोलिसांचा तगडा बंदोबस्त
अमरावती : जिल्हा परिषदेत वाढत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात युवा स्वाभिमान संघटनेने सोमवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व आरोग्य अधिकारी यांची खुर्ची जप्त करून त्याचा लिलाव करण्यासाठी म्याऊ आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी प्रवेशव्दारावरच रोखले. त्यामुळे काहीवेळ जिल्हा परिषद परिसरात तणाव निर्माण झाला होता.
जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या विविध विकासकामात बांधकाम विभागाकडून शासन निर्णयानुसार ३३.३३.३४ या रेशोअंतर्गत कामे ही ३३ टक्के सुशिक्षित बेरोजगार अभियंता व सोसायटींना ३३ टक्के यानुसार खुल्या निविदा काढणे आवश्यक आहे. याशिवाय तीन लाखांवरील कामासाठी ई-निविदा जाहीर करायला पाहिजे. परंतु असे न करता बांधकाम विभागाने सरळसरळ मोठ्या कामांचे तीन लाखांचे तुकडे पाडून या कामांची सुशिक्षित बेरोजगार, सोसायटी यांना ३ लाख रूपयांच्या खुल्या निविदा करून १० टक्के कमिशन बेसवर विकण्याचा कट रचला आहे.
ही कामे मर्जीतील व्यक्तींना देऊन कामे निकृष्ट केली जात आहे. त्यामुळे या कामात मोठी अनियमितता केली आहे.
८ पीएच लेखाशीर्षाखाली आरोग्य विभागातून मंजूर करण्यात आलेली कोट्यवधींची कामे तुकडे पाडून मेळघाटातील आदिवासी विकास कामांची वाट लावणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
पोलीस आंदोलकांमध्ये चकमक
अमरावती : युवा स्वाभिमान संघटनेचे मेळघाट संपर्क प्रमुख उपेन बच्छले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयापासून जिल्हा परिषदेत आंदोलन करण्यासाठी येणाऱ्या युवा स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या प्रवेशव्दारावरच पोलिसांनी रोखले. त्यामुळे काही वेळ पोलिस व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे आंदोलकांना पोलिसांनी आंदोलनापूर्वीच ताब्यात घेतले. यावेळी आंदोलन कर्त्यासह मांजर सोबत घेऊन जिल्हा परिषदेत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलक कार्यकर्त्यालाही पोलिसांनी अटक केली. त्यामुळे आंदोलन या ठिकाणीच निवळले या आंदोलनात उपेन बच्छले, चेतन बाळापुरे, नितीन वर्मा, सुनील बोरकर, सोनू पठाण, दीपक पंडोले, संजय हरसुले, मिराबाई, आशा बाई, शेख महेबुब, अजिक्य खेरडे, दिपेश खेरडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. गाडगेनगरचे ठाणेदार के.एन. पुंडकर यांनी जिल्हा परिषद आवारात चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलन करणारच
मेळघाटातील जनतेच्या आरोग्यासाठी आलेल्या ८ पीएच या लेखाशिर्षातील कोट्यवधी रूपयांच्या कामाचे तुकडे पाडल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच याची दखल घेवून युवा स्वाभिमान संघटनेने म्याऊ आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला होता. मात्र आंदोलनापूर्वी हे आंदोलन दाबण्यास जो प्रयन्न पोलिसांनी केला तरीही जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराचे कुरण उकळून फेकल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा उपेन बच्छले यांनी दिला आहे.