लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पत्नी व मुलासह दुचाकीने अंजनगाव बारी गावाकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराच्या गळ्यात नॉयलॉन मांजा अडकून त्याचा मृत्यू झाला होता. १४ जून रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास अकोला-नागपूर महामार्गावरील वरुडा येथील ओव्हरब्रिजवर ती हृदयद्रावक घटना घडली होती. त्याप्रकरणी मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी सहा महिन्यांनंतर ११ डिसेंबर रोजी सायंकाळी अज्ञाताविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. शुभम रामेश्वर बिल्लेवार (२८, रा. कृषीनगर, अकोला) असे मृताचे नाव आहे.
शुभम हे १४ जून रोजी दुपारी पत्नी मुलगा व मुलीसह एमएच ३० बीयू ७७४२ या मोपेडने अंजनगाव बारी येथे एका नातेवाइकाच्या लग्नाला जात होते. त्यांच्या पश्चात त्यांचे अन्य नातेवाईकदेखील दुचाकीने येत होते. दरम्यान, वरुडा येथील फ्लायओव्हरवर झाडाला अडकलेला मांजा अचानक दुचाकी चालवीत असलेल्या शुभमच्या गळ्याला आवळला गेला. त्यात त्याचा गळा चिरला. सबब, त्यांनी अचानक ब्रेक मारल्याने दुचाकीलादेखील अपघात झाला. त्यामुळे चौघेही दुचाकीसह खाली पडले. शुभम यांचा गळा नायलॉन मांजामुळे कापला गेल्याने त्यांच्या गळ्यातून रक्त वाहत होते. ते घटनास्थळीच बेशुद्ध पडले, तर त्यांच्या पत्नीला डोक्याच्या मागील बाजूस मार लागल्याने व पतीला डोळ्यांदेखत मरणासन्न स्थितीत पाहिल्याने त्यादेखील बेशुद्ध पडल्या. दोघांनाही मागून येणाऱ्या नातेवाइकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; परंतु मांजाने गळा चिरून अतिरक्तस्राव झाल्याने शुभमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यावर बडनेराचे ठाणेदार पुनित कुलट यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला होता. त्यावेळी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
काय आहे तक्रारीत?
पतीच्या अकाली मृत्यूबाबत शुभम बिल्लेवार यांच्या पत्नीने बडनेरा पोलसांत तक्रार नोंदविली. कोणी तरी अज्ञात आरोपीने प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजाने पतंग उडविली. त्या मांजाने रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवरील लोकांच्या गळ्याला दुखापत होऊन त्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो, याची माहिती असतानादेखील अज्ञाताने बेदरकारपणे व निष्काळजीपणे मुख्य रस्त्यावर मांजा अडकवून तो तसाच सोडून दिला. तो मांजा अडकून आपल्या पतीच्या गळ्यात अडकून त्यांचा गळा कापला कापला गेला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे शुभम यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे.