वडाळीच्या खोलीकरणासाठी युवक काँग्रेसचे अर्धदफन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 21:27 IST2019-05-31T21:27:18+5:302019-05-31T21:27:25+5:30
वडाळी तलावाच्या खोलीकरणासाठी १८ व १९ मे रोजी महाश्रमदानाची संकल्पना महापालिकेने राबविली.

वडाळीच्या खोलीकरणासाठी युवक काँग्रेसचे अर्धदफन आंदोलन
अमरावती : ब्रिटिशकालीन वडाळी तलावाच्या खोलीकरणात हयगय चालविल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांनी ३१ मे रोजी अर्धदफन आंदोलन केले. यावेळी प्रकृती बिघडल्याने एका आंदोलनकर्त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत तलावाच्या खोलीकरणासाठी दोन कोटी रुपये प्रशासनाने मंजूर केले.
वडाळी तलावाच्या खोलीकरणासाठी १८ व १९ मे रोजी महाश्रमदानाची संकल्पना महापालिकेने राबविली. त्यानंतर तलावाच्या खोलीकरणाकडे पाहिजे त्या प्रमाणात शहर-जिल्हा प्रशासनाने लक्षच दिले नाही. येथे किमान पाच फूट खोल गाळ काढावा लागेल. मात्र, मोठा गाजावाजा करून गाळ काढण्याकरिता लावण्यात आलेले जेसीबी आता तेथे आढळून येत नाही. याबाबत रोष व्यक्त करीत युवक काँग्रेसच्यावतीने ३१ मे रोजी तलावात अर्धदफन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार अमरावती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नीलेश गुहे यांच्या नेतृत्वात गुरुवारी सकाळी ७.३० वाजता अर्धदफन आंदोलनाला सुरुवात झाली. तलावाच्या परिसरात पोहोचलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी स्वत:ला जमिनीत अर्धे गाडून घेतले. दुपारी ३ वाजेपर्यंत ४६ अंश तापमानातही कार्यकर्ते टिच्चून आंदोलन करीत होते. यादरम्यान नीलेश गुहे यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आंदोलनात नीलेश गुहे, तन्मय मोहोड, अमित गुडदे, अभिषेक साखरे, प्रशांत यावले यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी माजी आमदार रावसाहेब शेखावत, पुरुषोत्तम मुंधडा, सूरज अडायके, गुड्डू हमीद, संकेत साहू, अमोल गुहे, पंकज गुहे, प्रमोद राऊत, अंकुश टोपले, अभी धुरजड यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
खोलीकरणासाठी दोन कोटी
वडाळी तलावात आंदोलन सुरू असताना आमदार यशोमती ठाकूर व आमदार वीरेंद्र जगताप यांनी याच मुद्द्यावर विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाºयांची बैठक घेतली. याप्रसंगी आमदार सुनील देशमुख यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्हाधिकाºयांना खोलीकरणासाठी दोन कोटी उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या. मागणी मान्य झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.